परभणी - महाराष्ट्राच्या इतिहासात 'नीट'चा यावर्षी सर्वात निचांकी निकाल लागला असून याला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र इंग्रजी शाळा शिक्षक संघटनेचे (मेस्टा) अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी केला आहे. ते परभणीत पत्रकार परिषदेत बोलत होते. औरंगाबाद येथे एका इंग्रजी शाळेवर झालेला हल्ला आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज परभणीत पार पडलेल्या संघटनेच्या बैठकीनंतर संजय तायडे पाटील हे पत्रकारांशी बोलत होते.
राज्यातील विद्यार्थ्यांना आठ महिन्यांपासून कुठलीही शाळा, शिकवणी आणि मार्गदर्शन मिळाले नाही. विद्यार्थ्यांची तयारी नसतानाही त्यांना परीक्षेला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे या आठ महिन्यात शिक्षणमंत्री गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी कुठलेही प्रयत्न केले नाहीत. त्यांना 'नीट'च्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन मिळावे, यासाठी शासनाकडून कुठल्याही उपाययोजना किंवा ऑनलाइन शिक्षण तसेच शिकवणी, अशी काहीही तयारी झाली नाही. ज्यामुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यावेळी औरंगाबाद येथील इंग्रजी शाळेवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. याचा निषेध म्हणून इंग्रजी शाळांची ऑनलाइन शिकवणी दोन दिवस बंद ठेवून आंदोलन करण्यात येत असल्याचेदेखील सांगण्यात आले. तसेच यावेळेची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 'मेस्टा' लढवणार असल्याचे तायडे यांनी यावेळी जाहीर केले. त्यांचे राज्यभर 70 हजार नोंदणीकृत सभासद आहेत. राज्यातील पाच हजार शाळांमध्ये हे शिक्षक काम करत आहेत. मात्र, आतापर्यंत या शिक्षकांसाठी विद्यमान एकाही पदवीधर आमदाराने काम केलेले नाही, त्यांच्यासाठी कुठल्याही उपाययोजना, सवलती व योजना आणल्या नाहीत. त्यांना मोठ्या पदावर कसे जाता येईल, व त्यांच्यासाठी इतर शासकीय लाभ देण्यासाठी प्रयत्न केले नाही. ज्यामुळे सर्व इंग्रजी शाळांचे शिक्षक नाराज असून ते यावेळेस मेस्टाच्या पाठिशी उभे असून त्यांच्या बळावर 'मेस्टा'चा उमेदवार विधान परिषदेत जाणार असल्याचा विश्वास तायडे यांनी व्यक्त केला.