परभणी - पाथरी तालुक्यातील मरडसगावच्या ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करूनही दत्तक बँक मिळत नसल्याने मंगळवारी गोदापात्रात सामूहिक जलसमाधी आंदोलन केले. दत्तक बँक मिळालीच पाहिजे अशा घोषणा देत आंदोलकर्त्यांनी पात्र दणाणून सोडले.
हे आंदोलन गोदावरी नदीच्या ढालेगाव बंधाऱ्याच्या बँक वाटरमध्ये करण्यात आले. मागील काही महिन्यापासून मरडसगाव ग्रामस्थ दत्तक बँक देण्यात यावी, यासाठी प्रशासनाकडे वारंवार निवेदने देत आहेत. मात्र, कार्यवाही होत नसल्याने मंगळवारी (५ मार्च) दुपारी मरडसगावचे ग्रामस्थ नदी पात्रात उतरले.
यावेळी 'येत्या पंधरा दिवसात महाराष्ट्र बँक गावाला दत्तक म्हणून घेईल, न घेतल्यास जिल्हाधिकारी यांच्या सोबत ग्रामस्थांची बैठक करून तोडगा काढला जाईल, असे आश्वासन तहसील प्रशासनाच्या अधिका-यांनी आंदोलकांना दिले. त्यानंतर हे आंदेलन मागे घेण्यात आले. आंदेलनस्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.