ETV Bharat / state

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांची दैना, आजीला पाठीवर घेऊन 3 किमी चिखल तुडवत त्याने गाठले रुग्णालय - Bad condition of roads in Parbhanis rural area

जिल्ह्यातील आदिवासी लोकवस्ती असलेल्या जिंतूर तालुक्यातील पिंपराळा गावातील कौसाबाई चाफे या आजीला अचानक जुलाब आणि उलट्या व्हायला लागल्या. घरगुती उपचार करूनही त्रास थांबत नसल्याने या आजीला राजकुमार नावाच्या तिच्या नातवाने रुमालाने पाठीवर बांधून 3 किमी चिखल तुडवत पुढील उपचारासाठी जिंतूर येथील रुग्णालयात आणले.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांची दैना
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांची दैना
author img

By

Published : Sep 28, 2020, 7:24 PM IST

परभणी - देश स्वतंत्र झाल्याच्या 74 वर्षांनंतरही ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रस्ते उपलब्ध नसल्याची शोकांतिका आहे. जिंतूर तालुक्यातील पिंपराळा या गावातदेखील हीच परिस्थिती असून, एका वयोवृद्ध आजीला चक्क पाठीवर बसून 3 किलोमीटर पायपीट करत नातवाला रुग्णालय गाठावे लागले. धो-धो पाऊस बरसत असल्याने रस्त्यावर चिखल झाला होता. परिणामी वाहन जात नसल्याने या नातवाला घरच्या दोन महिलांसह आजीला अशा पद्धतीने रुग्णालयात न्यावे लागले. ज्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांची दैना

जिल्ह्यातील आदिवासी लोकवस्ती असलेल्या जिंतूर तालुक्यातील पिंपराळा गावातील कौसाबाई चाफे (वय 85) या आजीला अचानक जुलाब आणि उलट्या व्हायला लागल्या. घरगुती उपचार करूनही त्रास थांबत नसल्याने या आजीला राजकुमार (वय 18) नावाच्या नातवाने रुमालाने पाठीवर बांधून पुढील उपचारासाठी जिंतूरला आणले. 74 वर्षपासून या गावातील नागरिकांच्या वाट्याला अशीच दैना आहे. कारण या गावाने अजूनही पक्का रस्ता पाहिलेला नाही. रस्ता नसल्यामुळे कित्येक महिला वाटेतल्या माळरानाजवळ बाळंत झाल्या आहेत. अनेक मुला-मुलींनी शिक्षण अर्धवट सोडले, सर्प, विंचूदंश, विषबाधा अर्धांगवायू, हृदयविकार अशा अवस्थेचे रुग्ण कायम 'अधू' झाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच एका वृत्तवाहिनीने गावात जाऊन, लोकांच्या व्यथा मांडल्या होत्या. या गावातील अनेक महिला प्रसूतीसाठी जिंतूरकडे नेताना रस्त्यावर माळाच्या पायथ्याशी प्रसूत झाल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाकडे पिंपराळा गावाला रस्ता द्या म्हणून, गावकऱ्यांनी अनेकदा विनंतीअर्ज केले. मात्र, अद्याप एकाही अधिकाऱ्याला पाझर फुटलेला नाही की, एकाही नेत्याने या गावच्या प्रश्‍नाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या गावच्या रस्त्याची परिस्थिती अजूनही तशीच आहे. सुदैवाने या आजीली रुग्णालयात नेण्यासाठी तिचा तरुण नातू उपस्थित होता. मात्र, अशी कित्येक घरे असतील ज्यामध्ये वृद्ध व्यक्ती किंवा महिलांना अशी परिस्थिती उद्भवल्यास रुग्णालयात वेळेवर पोहोचवणारं कोणीच नाही. अशी परिस्थिती कित्येकांच्या जीवावर उठू शकते. नागरिक गेल्या कित्येक वर्षांपासून 'तत्काळ' हा रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी करत आहेत. मात्र, इतके असूनही प्रशासनाला जाग येणार तरी कधी हा प्रश्न यावेळी उपस्थित होतो.

हेही वाचा - परभणीच्या करपरा नदीतून जीवघेणा प्रवास; स्वातंत्र्यापासून होतेय पुलाची मागणी

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.