परभणी- कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य आजाराने संपूर्ण जगात हाहाकार उडवला आहे. जगातील प्रत्येक देश या आजारापासून त्यांच्या जनतेला दूर ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहेत. वेळप्रसंगी बळाचा वापरही होत आहे. नवनवीन युक्त्या वापरून जनजागृती करण्यात येत आहे. पोलीस, माध्यमे आणि विविध समाजसेवकांमार्फतदेखील जनजागृती केली जात आहे. अशीच एक जनजागृती परभणीचे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दासराव पुंडगे यांनी आपल्या शाहीरी अंदाजातून गायलेल्या गाण्यातून केली आहे.
हेही वाचा- #Corona: कल्याण-डोंबिवलीत आणखी तीन रुग्ण; सहा महिन्यांचे बाळही 'पॉझिटिव्ह'
परभणी पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक शाहीर दासराव कोंडके ताडकळस पोलीस ठाण्यातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गायलेले शायरी अंदाजातील हे गाणे सध्या परभणी वर्तुळात विविध समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले आहे. गाणी गाण्याचा छंद असलेल्या दासराव पुंडगे यांनी सेवानिवृत्तीनंतर आपला छंद सत्कारणी लावण्याचा प्रयत्न केला. कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये म्हणून पोलीस दलाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. जनजागृतीसाठी वारंवार आवाहन, सूचना दिल्या जात आहेत. या विषयाला धरूनच दासराव पुंडगे यांनी आपले हे शाहिरी अंदाजातील गाणे सादर केली आहे.
देशाचे पंतप्रधान आणि महाराष्ट्र शासन कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी ज्या-ज्या सूचना देत आहेत त्याचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी आपल्या या गाण्यातून लोकांना केले आहे. त्यांना सोबत दिली आहे. गायिका ललीता शिरसाठ, स्वरा शिरसाठ आणि ढोलकीवादक सुभाष जोगदंड यांनी.