पलक्कड Virender Sehwag : गोलंदाजांसाठी कर्दनकाळ म्हणून ओळखला जाणारा वीरेंद्र सेहवाग क्रिकेटमधून निवृत्तीनंतर अनेक भूमिकांमध्ये दिसला. कधीकधी तो टीव्हीवर समालोचन करताना दिसला तर कधीकधी तो कोचिंगमध्ये हात आजमावताना दिसला. त्याच्या बेफिकीर शैली आणि उत्साही वृत्तीसाठी ओळखला जाणारा वीरु पहिल्यांदाच एका खास अवतारात दिसला आहे. 'नजफगडचा नवाब' म्हणून प्रसिद्ध असलेला वीरेंद्र सेहवाग आता धार्मिक वेशभूषेत दिसला आहे.
मंदिरात केली विशेष पूजा : वीरेंद्र सेहवाग नुकताच केरळ दौऱ्यावर गेला होता. पलक्कड हे मध्य केरळमधील एक लहान डोंगराळ शहर आहे. सुंदर दऱ्या आणि ट्रेकिंग ट्रेल्ससाठी प्रसिद्ध असलेल्या पलक्कडमध्ये एक जगप्रसिद्ध मंदिर देखील आहे. पलक्कड जिल्ह्यातील कविलपाड इथं असलेल्या पुलिकल विश्व नागायक्षी मंदिराला भेट दिली. त्यानं मंदिराच्या भेटीचे फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअरही केले आहेत.
कपाळावर मुंडू आणि कुंकू : यावेळी वीरु पारंपारिक पोशाखात दिसला. त्यानं मुंडू घातला आणि कपाळावर कुंकूही लावला. मंदिरात भारतीय खेळाडूनं विशेष पूजाही केली होती. मंदिराची प्रदक्षिणा केल्यानंतर, त्यानं मानवेंद्र वर्मा योगथिरीपाद यांच्याकडून प्रसाद स्वीकारला. सेहवाग म्हणाला की तो मॅच खेळायला वगळता केरळला कधीच आला नाही आणि येथील दृश्यं खूप सुंदर आहेत. सेहवागसाठी हा एक अद्भुत अनुभव असल्याचं त्यानं सांगितलं.
केरळला 20 वर्षांनी आला : 2005 मध्ये पाकिस्तानविरुद्ध आणि 2006 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यांसाठी सेहवाग कोचीला आला होता. दरम्यान, भारतीय दिग्गज खेळाडूनं माध्यमांशीही संवाद साधला. चाहत्यांसोबत फोटो क्लिक केले. विशेष म्हणजे पलक्कड हे त्याच्या ग्रामीण परिसरामुळं आणि विस्तीर्ण भातशेतीमुळं केरळच्या इतर भागांपेक्षा वेगळं आहे. पलक्कडचा डोंगराळ परिसर पाहण्यासारखा आहे. केरळच्या तांदळाच्या उत्पादनात पलक्कडची महत्त्वाची भूमिका असल्यानं त्याला 'केरळचा तांदळाचा कटोरा' असंही म्हटलं जातं.
हेही वाचा :