परभणी - लग्नापूर्वी असलेल्या संबंधावरून प्रियकराने विवाहितेला शेवटचे भेटण्यासाठी बोलावले आणि कोयत्याने गळा चिरून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळावर उपलब्ध पुराव्याच्या आधारे 24 तासात आरोपीला जेरबंद केले आहे.
मानवत तालुक्यातील रामपूरी शिवारात ऊस तोड करणारी टोळी मागील काही दिवसांपासून वास्तव्यास आहे. या टोळीतील एक विवाहित तरुणी काही दिवसांपूर्वी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शौचाच्या निमित्ताने टोळीवरून गेली, ती परत आलीच नाही. आई, वडील, सासु, सासऱ्यांनी परिसरात शोध घेतला. पण, ती न सापडल्याने नातेवाईकांनी मानवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर दि. 8 फेब्रुवारीला रामपूरी शिवारातील यादव यांच्या ऊसाच्या शेतात एका अज्ञात महिलेचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत मिळून आले. प्रेताचे धड अर्धवट अवस्थेत होते. मात्र, साडी, चप्पल यावरुन ही महिला ऊसतोड कामगाराच्या टोळीतील काही दिवसांपूर्वी हरवलेली महिला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे घटनास्थळावर श्वान पथक, ठसे तज्ज्ञांचे पथक आणि डॉक्टरांना पाचारण करुन घटनेचा कसून तपास सुरू करण्यात आला. दरम्यान, शेतमालक यादव यांच्या तक्रारीवरून महिलेचा खून करणाऱ्या अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली मानवत पोलीसांसोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात झाले. मृत महिलेच्या नातेवाईकांकडून महिलेच्या फोन संदर्भात माहिती गोळा करण्यात आली. गावातील ऑटोचालकांकडे तपास केला. या दोन्ही बाबींमधून काही माहिती पथकाच्या हाती लागली. त्या आधारे तत्काळ तट्टू जवळा आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी तसेच पुणे येथे पथक रवाना झाले. त्यानुसार पुण्यातून एका संशयितास ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली. संशयिताच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याचे मृत महिलेशी असलेल्या संबंधाबाबत पुष्टी दिली. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच संशयित आरोपीने खून केल्याची कबुली दिली.
त्यानुसार, आरोपी संजय उर्फ पप्पु रमेश जोंधळे याचे व मृत महिलेचे तिच्या लग्नापूर्वीपासून प्रेमसंबंध होते. तिचे लग्न अन्य एका तरुणाशी झाल्यानंतर देखील हे संबंध चालूच राहिले. एकमेकांशी फोनवर संपर्क देखील चालूच होता. मात्र, मृत महिलेला यापुढे संपर्क ठेवणे शक्य नाही, असे सांगितले. म्हणून शेवटचे रामपुरी शिवारात भेटून जा, असा निरोप दिला. मृत महिला त्याच्याशी प्रेमसंबंध चालू ठेवणार नाही. याची संजय जोंधळेला खात्री झाली आणि त्याचवेळी त्याने तिचा खून करण्याचा निश्चय केला होता. त्यानुसार रामपुरी शिवारात जाताना झाडावरुन नारळ तोडण्याचा कोयता तो सोबत घेऊन गेला. टोळीच्या राहण्याच्या ठिकाणाजवळील ऊसाच्या शेतात मृत महिलेला भेटण्यासाठी बोलावले. महिला तेथे येताच तिला गोड बोलून ती बेसावध असताना तिच्या गळ्यावर आणि डोक्यावर कोयत्याने सपासप वार केला. यात तिचा खून केला. त्यानंतर तेथून तो निघून गेला. शेतात प्रेत कुजुन गेले. प्रेताचा वास सुटल्यानंतर प्रेत तेथे असल्याची घटना उघड झाली होती.
दरम्यान, गुन्हा 8 फेब्रुवारीला दाखल झाल्यानंतर पुढील 24 तासाच्या आतच हा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणून आरोपीला अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक रागसुधा आर., उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण मोरे, पोलीस उपनिरीक्षक किशोर नाईक, कर्मचारी सुरेश डोंगरे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, संजय शेळके, अरुण पांचाळ, शंकर गायकवाड, जमीरोद्दिन फारोकी, किशोर चव्हाण, कैलास कुरवारे, युसुफ पठाण, संजय घुगे, छगन सोनवणे, सायबर सेलचे बाचेवाड, बालाजी रेड्डी, राजेश आगाशे यांनी केली.
हेही वाचा - बँक फोडणाऱ्या चार आरोपींना अटक; परभणी स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी