परभणी - 3 मेपर्यंतच्या लॉकडाऊननंतर 'ऑरेंज झोन'मध्ये असलेल्या परभणीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर काही आस्थापनांना तसेच सेवांना परवानगी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती; परंतु सभोवतालच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या पाहता परभणीच्या जिल्हा प्रशासनाने 10 मेपर्यंत परिस्थिती जैसे थे राहणार असल्याचे आदेश बजावले आहेत. त्यानुसार यापूर्वी प्रमाणेच सकाळी 7 ते 11 या वेळेत किराणा आणि भाजीपाला खरेदी करता येणार असून, अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुणालाही परवानगी दिलेली नाही.
या संदर्भात परभणी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज (रविवार) दुपारी सव्वाचार वाजता अध्यादेश जारी केला आहे. यामध्ये 10 मेपर्यंत कुठलाही बदल होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा कालावधी 3 मे रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे 4 मेपासून ऑरेंज तसेच ग्रीनझोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये अन्य काही व्यवसाय, दुकाने आणि सेवा सुरू करण्यास परवानगी मिळेल, अशी अनेकांनी अपेक्षा व्यक्त केली होती; परंतु ऑरेंजमध्ये असलेल्या परभणी जिल्हात इतर कुठल्याही सेवांना किंवा आस्थापनांना परवानगी देण्यात आलेली नाही.
सकाळी 7 ते 11 या वेळेतच नागरिकांना भाजीपाला आणि किराणा सामान खरेदी करता येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू होणार आहे. या कालावधीत केवळ वैद्यकीय सेवा आणि मेडिकल दुकाने सुरू राहणार आहेत. या बाबीचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी बजावले आहेत.
सवलत न देण्याचे 'हे' आहे, प्रमुख कारण -
ऑरेंजझोनमध्ये असून देखील परभणीत अन्य व्यवसाय आणि सेवांना परवानगी देण्यात आली नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे परभणी जिल्ह्याच्या सभोवताल असलेल्या नांदेड, हिंगोली, जालना, लातूर या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. इतर व्यवसाय, सेवा आणि आस्थापनांना परवानगी दिल्यास अन्य जिल्ह्यातून होणारी वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. परिणामी परभणीतदेखील कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. यापार्श्वभूमीवर परभणीत संचारबंदीतून सूट देण्यात आलेला यापूर्वीचा सकाळी 7 ते 11 हाच वेळ कायम ठेवण्यात आला आहे.
तळीराम, तंबाखू शौकिनांचा हिरमोड
परभणीत केंद्राने दिलेल्या सूचनांप्रमाणे काही अटी व नियमानुसार दारूची दुकाने व पानटपऱ्या खुल्या होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र 10 मेपर्यंतच्या निर्णयानुसार दारूची दुकाने आणि पानटपऱ्या उघडणार नाही, हे स्पष्ट झाल्यामुळे तळीरामांचा तसेच तंबाखू शौकिनांचा हिरमोड झाला आहे.