परभणी - शहरातील उघडा महादेव ते कारेगाव या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना तसेच वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रोजच्या या त्रासामुळे नागरिक अक्षरशः वैतागले असून त्यांनी आज याच खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन सुरू केले. मात्र, महापालिकेने ऐनवेळी येऊन मुरूम टाकून हे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवले. मात्र, नागरिकांचे यामुळे पूर्ण समाधान झाले नसून हा रस्ता पक्क्या स्वरूपात न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
उघडा महादेव ते कारेगाव दरम्यानचा रोड हा औद्योगिक वसाहतीकडे जाणारा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. असे असतानाही महापालिका मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाल्या नसल्याने पावसाचे पाणी व सांडपाणी रस्त्यावर साचून राहते. परिणामी रोगराईचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांना कायम मानसिक व शारीरिक तसेच आरोग्याच्या त्रासाला तोंड द्यावे लागते. खड्ड्यांमुळे या भागात अपघाताची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे कपिल नगर, संगम मित्र कॉलनी, प्रियदर्शनी नगर, सहारा कॉलनी, महात्मा फुले नगर, आंबेडकर नगर, आहिल्याबाई होळकर नगर येथील नागरिकांनी आज त्रासून या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन छेडले होते.
यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व या भागातील नगरसेवकांनी तत्काळ मुरुमाचा वापर करून खड्डे बुजवले. परंतु, यावर नागरिक समाधानी नाहीत. या रस्त्याचे डांबरीकरण करून त्याला मजबूत करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. तसेच दोन्ही बाजूने नाल्या काढाव्यात, नवीन पाण्याची पाईपलाईन करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी लावून धरली होती. तसेच या भागातील अस्वच्छतेमुळे डेंग्यू सारखे आजार वाढले असून त्यावरही उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. या सर्व सोयी लवकरात लवकर उपलब्ध करून न दिल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. या आंदोलनात अॅड. लक्ष्मण काळे, प्रभाकर जगदाळे, शिवाजी सपकाळ, अनिल कांबळे, अशोक निलावार, अशोक वायकर, बबन इंगोले आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा- परभणीत भाजपसह अजित पवार समर्थकांचा जल्लोष