परभणी - दुकान बंद करुन घरी जाणाऱ्या सराफा दुकानदाराला लुटण्याचा प्रकार पाथरी येथे घडला. त्याच्याकडील ३२ तोळे सोने, ८ किलो चांदी आणि ९० हजारांची रोकड चोरांनी पळवली आहे. या प्रकारामुळे शहरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असून, चोरांचा तपास सुरू आहे.
शेख सोहेल शेख अजमद हे कारागीर शशीकांत डहाळे यांच्यासह सराफा व्यापारी बुधवारी रात्री दुकान बंद करुन घराकडे जात होते. मात्र, वाटेतील जिल्हा परिषदेच्या मैदानातच त्यांच्या दुचाकीला चारचाकीने धडक दिली. यामुळे ते खाली पडले. तेव्हा त्यांच्या हातातील बॅग एका बाजूला पडली. चारचाकीतील एकजणाने उतरुन बॅग उचलली आणि पोबारा केला.
चोरी झाल्याची तक्रार सोहेल शेख यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानुसार पाथरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. तत्पूर्वी, पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच, मध्यरात्री शहरात व शहराबाहेर नाकाबंदी सुद्धा केली. मात्र चोर काही हाती लागले नाहीत. दरम्यान या बॅगमधील ३२५ ग्राम सोने, ८.५ किलो चांदी आणि रोख ९० हजार रुपये असा एकूण १२ लाख १६ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी अवेज काजी करत आहेत.