परभणी - पाथरी शहरातून माजलगावकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी फाट्याजवळ आज सायंकाळी टाटाची जीप आणि स्विफ्ट डिझायर यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत एक ठार झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी पाथरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. जखमींपैकी ४ जण गंभीर जखमी आहेत.
टाटाची (एम. एच. २३ इ. ५३४४) ही जीप गेवराईहुन पोहरादेवीच्या दर्शनासाठी जात होती, तर स्विप्ट डिझायर (एम. एच. २४ व्ही. ८७८९) ही कार केजकडे निघाली होती. या दोन्ही गाड्या भरधाव वेगात समोरासमोर धडकल्या. याबाबत पाथरी ग्रामीण रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, कारचालक लिंबाजी बन्सी चाटे (वय ३५ रा. तांबवा ता.केज) हे जागीच मरण पावले. तर जातेगाव (ता. गेवराई) येथून आलेली टाटा पॅशिओ जीपमधील बाबासाहेब जाधव (वय ३६), जिजाबाई काला राठोड (४८), कमलबाई बालासाहेब जाधव (५० गेवराई), मालाबाई उत्तम पवार (५० जातेगाव) हे ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
या शिवाय अतुल बालासाहेब जाधव (१४), रत्नमाला प्रकाश ढोरमारे (२०), शुभम रोहीदास पवार (१२), स्वप्निल रेहिदास पवार (८), शामल रेहिदास पवार (३६), काला गवा राठोड (६१ सर्व रा. साकरळ), बप्पासाहेब पांडूरंग खंडागळे (५२, गेवराई) हे देखील जखमी झाले आहेत.