परभणी - शहरातील हरियाणा जिलेबी सेंटरचे मालक सनी सिंग गेल्या नऊ वर्षांपासून नववर्षाच्या पहिल्या दिवशी जन्मलेल्या कन्यारत्नाच्या पालकांना 2 किलो मोफत जिलेबी देऊन तिचे स्वागत करत आहेत. आज (1 जानेवारी) त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जन्मलेल्या एका भाग्यवान मुलीला चक्क सोन्याचे नाणे दिले आहे.
हरियाणा येथून स्थलांतरीत झालेले सनी सिंग आणि त्यांचे वडील गेल्या 42 वर्षांपासून परभणीकरांना गरमागरम जिलेबीचा आस्वाद देत आहेत. शहरातील बस स्थानक परिसरात त्यांचे दुकान आहे. आज दिवसभरात सनी यांनी 23 पालकांना प्रत्येकी दोन किलो जलेबी दिली. आपल्या वडिलांकडून हा उपक्रम राबवण्याची प्रेरणा मिळाल्याचे सनी सांगतात. यातून अनेक लोकांचे आशिर्वाद मिळत असल्याची भावनाही ते व्यक्त करतात.
हेही वाचा - नववर्ष स्वागत : मुंबईत वाहतूक पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल
सनी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन नववर्षी जन्मलेल्या कन्येच्या पालकांना स्वत: जलेबी दिली. तसेच लकी ड्रॉ काढून ११ चिमुकल्यांपैकी एका भाग्यवान कन्येला एक ग्रॅम सोन्याचे नाणेही दिले. हाफिजा शेख शाहरुख यांची मुलगी या लकी ड्रॉची विजेती ठरली. डॉ.मोना खान यांच्या हस्ते हे नाणे विजेत्या मुलीच्या आईला देण्यात आले. अनोखी आणि अनपेक्षित भेटवस्तू मिळाल्याने या भाग्यवान कन्येच्या परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.