परभणी - मागील महिन्यात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना संसर्गामुळे हैराण झालेल्या परभणीकरांना मे महिन्याच्या सुरुवातीपासून काहीसा दिलासा मिळत आहे. गेल्या 9 दिवसांत केवळ 2 दिवस वगळता नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. तसेच आज रविवारी देखील 1 हजार 37 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर नव्या 462 बधितांची नोंद झाली आहे. तसेच मृतांचीही संख्या कमी होत असून, 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
9 दिवसात 8083 रुग्ण कोरोनामुक्त
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून परभणीतील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत जात होता. त्यात एप्रिल महिन्यात तर प्रचंड वाढ झाली. गेल्या वर्षभरात आढळलेले रुग्ण एकट्या एप्रिल महिन्यात आढळून आले आहेत. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 43 हजारांच्यावर पोहोचला आहे. मात्र, आता मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून यात काहीसा दिलासा मिळताना दिसून येत आहे. 1 मेपासून आज 9 मे दरम्यान 2 आणि 6 तारीख वगळता दररोज आढळणाऱ्या बाधितांपेक्षा बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या नऊ दिवसात नव्याने 6607 नवे बाधित आढळले, तर 8083 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
6 हजार 570 बाधितांवर उपचार
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण ज्या प्रमाणात वाढत होते, आता त्याच प्रमाणात घटतांनाही दिसून येत आहेत. आज रविवारी 462 नवीन बाधित आढळले तर 1037 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 12 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या जिल्हा रुग्णालय, खाजगी दवाखाने आणि घरी राहून 6 हजार 570 बाधित उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत एकूण 1 हजार 27 करोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 42 हजार 970 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 35 हजार 373 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 2 लाख 63 हजार 239 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले आहेत. त्यात 2 लाख 20 हजार 167 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले, तर 42 हजार 970 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 1053 अनिर्णायक व 140 नमुने नाकारण्यात आले आहेत.
12 बाधितांचा मृत्यू
दरम्यान गेल्या 24 तासात जिल्ह्यात 12 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. यात 11 पुरुष तर केवळ एका महिलेचा समावेश आहे. यात सर्वाधिक जिल्हा रुग्णालयात 6, तर जिल्हा रुग्णालयाच्याच आयटीआय इमारतीमधील कोरोना हॉस्पिटलमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय भारत 2 व स्वाती या खाजगी हॉस्पिटलमध्ये 1 अशा एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
परभणी जिल्ह्यात 600 बेड शिल्लक
दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना हॉस्पिटल्ससह खाजगी मंगल कार्यालय आणि इतर इमारतीमधून 31 कोरोना हॉस्पिटल सुरू असून, या रुग्णालयांमध्ये 1910 बेडची व्यवस्था करण्यात आली असून, त्यापैकी सध्या 600 बेड रिकामे आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयात 2 तर जिल्हा रुग्णालयाच्या आयटीआय हॉस्पिटलमध्ये 63 बेड, जिल्हा परिषद कोरोना हॉस्पिटल 51, परभणी आयसीयू 2, स्वाती 8, भारत हॉस्पिटल 36, डॉ.प्रफुल पाटील हॉस्पिटल 37, देशमुख 8, अक्षदा मंगल कार्यालय 61, सूर्या 10, प्राईम 14, मोरे 4, अनन्या 3, सामले 8, सिद्धिविनायक 3, ह्यात 6, सुरवसे मॅटर्निटी 3, पाडेला 3, पार्वती 10, रेणुका 177, देहरक्षा 16, स्पर्श हॉस्पिटल 14, गोकुळ 7, पोले 38, पांडुरंग 3 तर कान्हेकर या खाजगी हॉस्पिरटलमध्ये 10 बेड शिल्लक आहेत. तर 5 हजार 260 रुग्ण घरून (होम आयसोलेशन) उपचार घेत आहेत. दरम्यान, नव्याने बाधित होणाऱ्या कोरोना रुग्णांनी बेड शिल्लक नसल्याच्या अफवांवर विश्वास न ठेवता, या रुग्णालयांमध्ये संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
हेही वाचा - 'गारुडी आणि पुंगीवाले सत्तेच्या टोपल्यांवर बसून पुंग्या वाजवीत आहेत'