परभणी - जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मृग नक्षत्राच्या मुसळधार सरी बरसल्या. गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पावसाने शहरातील लहान-मोठ्या नदी-नाल्यांना तसेच ओढ्यांना पूर आला आहे. शिवाय सखल भागांमध्ये पाणी साचले असून अनेक झोपडपट्ट्यांच्या भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. या मौसमातील हा पहिलाच मोठा पाऊस असून, सरासरीच्या ३३.६५ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ६१.३३ मिमी पाऊस मानवत तालुक्यात पडला आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. शिवाय काही झोपडपट्टी भागात घरातदेखील पाणी शिरले. साखला प्लॉट, परसावतनगर, वांगीरोड, धाररोड, जामरोड आदी भागातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. तसेच काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. शहरासह ग्रामीण भागातदेखील हीच परिस्थिती आहे.
मानवत तालुक्यातील मानोली येथील ओढा खळखळून वाहत आहे, तर गंगाखेडरोड वरील ब्राह्मणगाव जवळ असलेल्या छोट्या नाल्याला पूर आला आहे. पावसामुळे परभणी-गंगाखेड या महामार्गाचे काम विस्कळीत झाले आहे. मानवत, पाथरी आणि परभणी तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली असून, शेतांमध्ये पाणी साचल्याचे दिसून येत आहे.
परभणी तालुक्यात ४८.३८ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर पालम तालुक्यात २३.६७, पूर्णा २३.२०, गंगाखेड २१.७५, सोनपेठ २६, सेलू ३२.२०, पाथरी ४८.३०, जिंतूर १८ आणि मानवत तालुक्यात तब्बल ६१.३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासून आतापर्यंत सरासरी पावसाच्या ७०.३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस एकूण सरासरी वार्षिक पावसाच्या ८ टक्के आहे, तर आजपर्यंतच्या अपेक्षित पावसाच्या ५१ टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती परभणीच्या हवामान विभागाकडून मिळाली आहे.