परभणी - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या परभणी दौऱ्याचा फटका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिसरात असलेल्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाला बसला आहे. या दौर्याच्या पार्श्वभूमीवर हे महाविद्यालय आज (शुक्रवारी) बंद तर राहिलेच; मात्र, यामुळे तब्बल दोनशे मुक्या जनावरांची फरफट झाली आहे. चारा-पाण्याअभावी या जनावरांना मोठा त्रास सहन करावा लागला. या प्रकरणी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता नितीन मार्कंडेय यांनी विद्यापीठाच्या गलथान कारभाराविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त कडेकोट बंदोबस्त -
परभणीचे पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात आहे. आज राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त असल्याने विद्यापीठाच्या वतीने संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयाच्या प्राध्यापकांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांना पासेस देण्यात आल्या आहेत. मात्र, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या कोणत्याही कर्मचाऱ्यास पास देण्यात आला नाही. परिणामी सर्वांना प्रवेशद्वारावरून परतावे लागले.
'विद्यापीठ प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा' -
विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरच सकाळी सहयोगी अधिष्ठाता मार्कंडेय यांनाही पोलिसांनी रोखले. त्यांनी आपले ओळखपत्र दाखवले तरीही विद्यापीठ प्रशासनाकडून आलेल्या पासशिवाय प्रवेश मिळणार नाही, असे त्यांना सांगण्यात आले. मात्र, अन्य मार्गाने मार्कंडेय आपल्या कक्षात येऊन बसले. पण त्यांच्याशिवाय अन्य कोणीही या महाविद्यालयात येऊ शकले नाही. विद्यापीठ प्रशासनाने यासंदर्भात कमालीचा अक्षम्य हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप मार्कंडेय यांनी आपल्या निवेदनात केला आहे.
शासनाचे एका दिवसाचे वेतन अक्षरशः पाण्यात -
दरम्यान, आज दिवसभरात पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातील एकही कर्मचारी येऊ न शकल्याने शासनाचे एका दिवसाचे वेतन अक्षरशः पाण्यात गेले आहे, असेही मार्कंडेय यांनी म्हटले आहे. तर विद्यापीठ परिसरात ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त लावण्यात आल्याने विनापरवानगी कोणालाही फिरू देण्यात येत नव्हते. ज्यामुळे विद्यापीठ परिसरात असलेल्या सुमारे दोनशे जनावरांना देखील चरण्यास सोडण्यात आले नाही. तर पशुमहाविद्यालयात उपचारासाठी येणारे जनावरे पोहचु शकले नाहीत. ज्यामुळे माणसांप्रमाणे जनावरांनाही या दौऱ्याचा फटका बसला, असेच म्हणावे लागेल.
विद्यापीठ परिसरातील रहिवाशीही त्रस्त-
दरम्यान, विद्यापीठ परिसरात असलेल्या निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या प्राध्यापक, कर्मचारी यांच्या कुटुंबीयांना देखील मोठा त्रास सहन करावा लागला. या लोकांना देखील पास बंधनकारक करण्यात आली होती. ज्यामुळे हे लोक पाससाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात खेटे मारताना दिसून आले.