परभणी - झरी येथून दुधगावकडे जात असताना अज्ञात दरोडेखोरांंनी 2 सराफा व्यापाऱ्यांना रस्त्यात अडवून लुटल्याने खळबळ उडाली. हल्लेखोरांनी शस्त्रांनी या व्यापाऱ्यांना जखमी करत त्यांच्या जवळील सुमारे 4 लाखाहून अधिक किमतीचे सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम पळवली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
परभणी तालुक्यातील झरी हे सर्वात मोठे गाव असून या गावात नामदेव शहाणे आणि योगेश शहाणे या दोन सख्ख्या भावांचे शहाणे ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते सोमवारी रात्री आपले दुकान बंद करून त्यांचे गाव असलेल्या दुधगावकडे परतत होते. झरीपासून दोन किलोमीटर अंतर गेल्यानंतर लोअर दुधना प्रकल्पाच्या कालव्याजवळ अज्ञात दरोडेखोरांंनी त्यांना वाटेत आडवले. या चोरट्यांनी त्यांच्या जवळ असलेल्या तलवारी आणि इतर शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्या-चांदीचे सुमारे चार लाखांहून अधिक किंमतीचे दागिने आणि वीस हजार रुपये रोकड हिसकावून घेतली. दरम्यान शहाणे बंधूनी विरोध केल्याने चोरट्यांनी त्यांना तलवारीने जखमी देखील केले.
या चोरट्यांकडे हिरो होंडा स्प्लेंडर गाडी असून, ते त्यावरून सोन्या-चांदीचा माल घेऊन लंपास झाले. रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या सराफा बंधूंना मागून आलेल्या काही लोकांनी उचलून परभणीच्या जिल्हा रुग्णालयात आणून दाखल केले. या दोन्ही सराफा व्यापाऱ्यांची प्रकृती चांगली असून, ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलीस घटनास्थळावर मिळालेल्या पुराव्यावरून आरोपींचा शोध घेत आहेत.
कोरोनाच्या संकटात अनेक जण बेरोजगार झाले आहेत. ज्यामुळे छोट्या-मोठ्या चोऱ्यांसह आता वाटमाऱ्यांचे प्रकार देखील होत आहेत. यामुळे पोलीस प्रशासनाला अधिक सतर्क राहून अशा गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवणे गरजेचे झाले आहे.