परभणी - 'कोरोना' विषाणुच्या दहशतीने प्रत्येकाचे मन हेलावून गेले. या गंभीर परिस्थितीत जनतेला काहीतरी विरंगुळा देण्यासाठी आणि कोरोनाचे दडपण कमी व्हावे, म्हणून अनेक जण विविध रचना सादर करत आहेत. परभणीत काहींनी गाण्याच्या माध्यमातून तर कोणी शाहिरी अंदाजात 'कोरोना'बाबत जनजागृती केली. शिवाय एकाने 'कोरोना'वर पाळणाही गायला. त्यानंतर आता विद्यार्थिनीने चक्क भारुडातून 'कोरोना'ची गंभीरता स्पष्ट करतानाच त्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचा सामना कशा पद्धतीने करावा, याबाबत शासन आणि प्रशासन आपल्या परीने प्रचार आणि प्रसार करत आहेत. शिवाय सामान्य जनतेतील सूज्ञ नागरिकदेखील विविध माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
परभणीत एका पोलिसाने शायरी अंदाजात कोरोनाबाबत गीत गायले. शिवाय अनेकांची गीते समाजमाध्यमातून व्हायरल झाली आहेत. त्यात शिक्षकाने गायलेल्या पाळण्याची भर पडली. त्यानंतर आता सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या परिसरात राहणारी विद्यार्थिनी ऋतुजा काबरा हीने रचलेले भारुड आम्ही "ईटीव्ही भारत" च्या माध्यमातून आपणासाठी घेऊन आलो आहोत. जनजागृतीपर असलेले हे भारुड एकदा नक्कीच ऐकायला हवे.