परभणी - दहावीच्या परीक्षेत सोबतच्या सर्व मैत्रिणी उत्तीर्ण झाल्या. मात्र, स्वतः नापास झाल्याने दुःख सहन न झाल्याने दहावीच्या एका विद्यार्थिनीने विष पिऊन आत्महत्या केली. सुरेखा बाळासाहेब जाधव, असे या मृत मुलीचे नाव आहे. ती सेलू तालुक्यातील चिकलठाणा येथील रहिवासी होती. सुरेखा गावातील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात शिक्षण घेत होती.
शनिवारी राज्यातील दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात गावातील व सोबत शिकणाऱ्या सर्व मुली पास झाल्या. मात्र, केवळ आपणच कसे नापास झालो. याचे दुःख सुरेखाला झाले होते. याच दुःखात तिने दुपारी राहत्या घरी विष घेतले. यानंतर तिला त्रास सुरू झाल्याने ती घरा बाहेर पळू लागली. तेव्हा आईने काय झाले, असे विचारताच तिने मी नापास झाल्यामुळे विष घेतल्याचे सांगितले. हे ऐकताच आईने आरडाओरड केली. त्यामुळे जवळ असलेले शेजारी व नातेवाईक पळत आले आणि सुरेखाला सेलू येथे उपचारासाठी घेवून गेले. मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.
याबाबत सेलू पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करणयात आली असल्याची महिती पोलीस कर्मचारी बी. जी. पुरणवाड यांनी दिली. सुरेखाचे वडील हे शेतकरी असून त्यांच्याकडे केवळ ५ एकर जमीन आहे. यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो.