परभणी - गंगाखेड येथील व्यापार्याला लुटणार्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि सुमारे २ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अर्जुन नागनाथ बडवणे, किशोर विठ्ठल भोसले व साहिल सुदंर उर्फ राजेश जाधव (तिघेही रा.खडकपुरा गल्ली गंगाखेड, जि.परभणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीेंचे नावे आहेत.
वाटेत अडवून व्यापाऱ्याला लुटले होते -
गंगाखेड येथील व्यापारी अनिल यानपल्लेवार हे दुकान बंद करून घरी जात असताना तीन जणांनी २ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता त्यांना रस्त्यात थांबवत त्यांच्याजवळील पैशांची बॅग लांबवली होती. यात तब्बल १ लाख ९५ हजार ५०० रुपये एवढी रक्कम होती. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी स्थानिक गुन्हे शाखेमार्फत तपास करण्याचे आदेश बजावले होते.
आरोपींनी तुळजापूरच्या धाब्यावर केली फायरिंग -
दरम्यान, आरोपींचा शोध घेत असताना, या गुन्ह्यातील आरोपींनी गंगाखेडात गुन्हा केल्यानंतर तुळजापूर येथील एका धाब्यावर त्यांच्याजवळील बंदुकीतून फायरिंग केली. याबाबत बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील एक आरोपी उस्मानाबाद पोलिसांनी ताब्यात घेतला. तर पोलीस अन्य आरोपींच्या शोधात होते. त्या दरम्यान परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी पुणे येथे पळून गेल्याची माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तत्काळ पुण्याकडे रवाना झाले.
एकूण २ लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त -
पोलिसांनी पुणे येथे जाऊन तीनही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून फायर केलेली पिस्तूल तसेच गु्ह्यातील मालांपैकी १ लाख ३ हजार ४०० रुपये आणि मोबाईल, असा एकूण २ लाख ८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी गुन्हा करतेवेळी वापलेली स्कुटीदेखील पोलिसांनी जप्त केली. या गुन्ह्यात आणखी काही आरोपी असून संपूर्ण टोळीला लवकर गजाआड केल्या जाईल, असे पोलिसांनी सांगितले.