परभणी - कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाप्रमाणेच पोलीस यंत्रणा देखील रात्रंदिवस मेहनत घेत आहे. 24 तास सेवा बजावणाऱ्या पोलिसांना 'कोरोना'ची बाधा होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे त्यांच्या निर्जंतुकीकरणासाठी परभणी पोलीस प्रशासनाच्या वतीने उपयोजना करण्यात आल्या आहेत. रस्त्यावर सेवा देणाऱ्यांसाठी व्हॅन तर पोलीस अधीक्षक कार्यालयात बोगद्याच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण यंत्रणा उभारण्यात आली आहे. तसेच मास्क आणि चेहरा झाकण्यासाठी फेसगार्डदेखील पुरवण्यात येत आहेत.
परभणी जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. ही चांगली गोष्ट असली तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परभणी जिल्ह्यात सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासनाकडून कडक उपाययोजना म्हणून सर्वप्रथम जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यानंतर जिल्हा अंतर्गत वाहतूक देखील बंद करण्यात आली. त्यानंतर लॉक-डाऊन आणि संचारबंदीची अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी पोलिसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे पोलिसांना 24 तास अलर्ट रहावे लागत आहे.
पोलिसांना कोरोनाची लढाई करताना अधिक धोका पत्करावा लागत आहे. त्यांचा हा धोका कमी करण्यासाठी परभणी पोलीस दलाच्यावतीने फिरती निर्जंतुकीकरण करणारी व्हॅन तयार करण्यात आली आहे. ज्या माध्यमातून रस्त्यांवर वाहतूक तसेच बंदोबस्तासाठी उभ्या असलेल्या पोलिसांना या माध्यमातून निर्जंतूक करण्यात येत आहे. याशिवाय पोलिसांचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात येणाऱ्या पोलिसांची तसेच विविध परवान्यांसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे या नागरिकांना तसेच पोलिसांना या ठिकाणी निर्जंतूक करण्यासाठी बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्यात स्प्रिंक्लर लावण्यात आले असून, त्या माध्यमातून हायपोक्लोराइड व इतर निर्जंतुकीकरण द्रव्य त्यांच्या अंगावर फवारले जाते. अशा पद्धतीने पोलिसांचे निर्जंतुकीकरण केले जात आहे.
याशिवाय पोलिसांना मास्कचे वाटप देखील करण्यात आले आहे. शिवाय आता फेसगार्ड अर्थात चेहरा झाकण्यासाठी पारदर्शी प्लास्टिकचे हेल्मेट पोलिसांसाठी आले आहेत. त्याचे वाटप देखील लवकरच होणार असल्याची माहिती डीएसबी शाखेचे पोलीस निरीक्षक संदीपान शेळके यांनी दिली आहे.