परभणी - सेलू येथील तब्बल दीड कोटींच्या लाच प्रकरणाला आता नाट्यमय वळण लागले आहे. या प्रकरणात दाखवण्यात आलेल्या अपघाताची चौकशी न करण्यासाठी सेलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल आणि दोघां कर्मचाऱ्यांनी मागितलेल्या दीड कोटींच्या लाचेपैकी 10 लाख स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणातील उद्योजक सुरेश करवा यांचा अपघात झाला नसून, त्यांचा सुपारी देऊन खून करण्यात आल्याची खळबळजनक माहिती शुक्रवारी पोलिसांनी दिली आहे. तर या खुनाचा सूत्रधार राहुल कासट यासह अन्य चार साथीदारांच्या पोलिसांनी मोठ्या शिथाफिने मुसक्या आवळल्याची माहिती पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी दिली.
यासंदर्भात शुक्रवारी संध्याकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मीना यांनी ही माहिती दिली. यावेळी तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रवण दत्त यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तपास पथकातील कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस तपासात खुनाची उकल -
सेलू येथे उद्योजक सुरेश करवा यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती. त्यातच सुरेश करवा यांची पत्नी व राहुल कासट यांचे संभाषण समाज माध्यमावर व्हायरल झाले. सुरुवातीला हे प्रकरण आपघाताभोवतीच फिरत होते. मात्र, पोलिसांनी अत्यंत बारकाईने या घटनेचा तपास केल्यानंतर सुरेश करवा यांचा अपघात झाला नसून खून करण्यात आल्याचे उघड झाले.
'असा रचला कट -
दरम्यान, या कटात जितेंद्र उर्फ भरतसिंग ठाकूर (वय 36, गायत्रीनगर सेलू) याला राहुल कासट याने सुरुवातीला सहभागी करून घेतले होते. सुरेश करवा ज्या रस्त्याने मोटरसायकलवर येणे-जाणे करतात, त्या मार्गावर पाळत ठेवून निर्जनस्थळी अपघात करून खून करावा, असे निश्चित करण्यात आले. त्यानुसार करवा यांच्यावर पाळत ठेवून त्यांचा खून करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. पण, हे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. जितू ठाकूर हा आरोपी खून करण्यात अयशस्वी होत असल्याने सूत्रधार राहुल कासट याने करवा यांच्याकडे काम करणारा हमाल विनोद भारत अंभोरे (वय30), विशाल सुरेश पाटोळे (वय 21) या दोघांना कटाची माहिती दिली. तसेच रोख रकमेची सुपारी देऊन सुरेश करवाचा खून करण्याच्या कटात सामील करून घेतले. राहुल कासट याच्या सांगण्यावरून विनोद अंभोरे याने चारचाकी वाहन खोटे बोलून भाड्याने घेतले. त्यावर चालक म्हणून राजेभाऊ रुस्तुमराव खंडागळे (वय 28) याला रोख रक्कम देऊन कटात सामील करून घेतले.
अपघाताच्या दिवशी, असा केला खून -
रविवारी 2 मे 2021 रोजी सूत्रधार कासट याने सर्व आरोपींना कट पूर्णत्वास नेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार विनोद अंभोरे याने चालक आरोपी राजेभाऊ खंडागळे याच्यासह भाड्याने घेतलेली चारचाकी आहेर बोरगाव रोडवरील सातोना टी पॉइंटवर थांबवून सुरेश करवा येण्याची वाट पाहिली. सायंकाळी सुरेश करवा हे शेतातून सेलू येथे घरी परतत असताना यातील मुख्य सूत्रधार राहुल कासट याने दिलेल्या सूचनेनुसार आरोपी राजेभाऊ खंडागळे याने चारचाकी वाहनाने करवा यांच्या मोटर सायकलचा पाठलाग केला. तसेच आरोपी विनोद अंभोरे, विशाल पाटोळे यांनी देखील कासटने पुरविलेल्या मोटरसायकलने सुरेश करवाचा पाठलाग केला. करवा हे रवळगाव मार्गावरील पुलाजवळ येताच राजेभाऊ खंडागळे याने त्यांना धडक देऊन खाली पाडले आणि त्याने घटनास्थळावरून पळ काढला. त्याचवेळी पाठीमागे मोटरसायकलवरून आलेल्या विनोद अंभोरे व विशाल पाटोळे यांनी त्यांची मोटरसायकल थांबवून करवा यांना काही कळण्याच्या आतच या दोघांनी दगडाने व लोखंडी सबलने डोक्यात वार करून ठार मारले.
प्रकरण शांत होईपर्यंत आरोपी जालन्याला पळून गेले -
दरम्यान, घटना स्थळावरून सेलूला परतलेले आरोपी कासट याच्याकडून पैसे घेऊन प्रकरण शांत होईपर्यंत जालना येथे पळून गेले होते. तर इकडे कासट याने हा अपघाताचा बनाव रचला. पोलिसांच्या तपासात या सर्व बाबी उघड झाल्या. त्यानुसार आरोपी राहुल भिकुलाल कासट याला पोलिसांनी हैदराबाद येथून ताब्यात घेतले. तर त्याच्या चौकशीतून अन्य चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. तसेच गुन्ह्यात वापरलेली हत्यारे व इतर तांत्रिक पुरावे देखील हस्तगत करण्यात आले आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्रवण दत्त एस. यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.
डीवायएसपी पाल यांच्यावर मुंबईच्या 'एसीबी'ची कारवाई -
महत्त्वाचे म्हणजे हा अपघात नसून खून असल्याचे एका व्हायरल ऑडिओ क्लिप मधून स्पष्ट झाले होते. ही क्लिप हाती लागल्यानंतर कारवाई करण्याऐवजी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांनी संबंधितांना हे प्रकरण दाबण्यासाठी 2 कोटी रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर दीड कोटीत हा सौदा ठरला. मात्र, 24 जुलै रोजी यापैकी दहा लाख रुपये स्वीकारताना मुंबईच्या लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजेंद्र पाल याच्यासह त्यांच्या दोन पोलिसांना रंगेहात पकडून अटक केली. यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती.