परभणी - जिंतूर रस्त्यावरील एका फर्निचरच्या शोरूमला पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आग इतकी भीषण होती की, या घटनेत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. पहाटे प्रभात फेरीसाठी (मॉर्निंग-वॉक) आलेल्या लोकांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर अग्निशमन दलाने दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
हेही वाचा - परभणी मनपाच्या 'स्थायी' सह सर्वच विषय समित्यांचे सभापती बिनविरोध
जिंतूर रस्त्यावरच्या विसावा कॉर्नरवरील इंडिया फर्निचर या शोरूमला पहाटे साडेतीन वाजता अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. यामध्ये दुकानातील सोफा सेट, लाकडी कपाट आणि इतर प्लास्टिकच्या वस्तूंनी पेट घेतला. यामध्ये सर्व साहित्य जळून खाक झाले. पहाटे साडे चार वाजता मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांना ही बाब लक्षात आल्याने त्यापैकी काहींनी अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती दिली. त्यानंतर काही क्षणात आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली.
हेही वाचा - चिमुकलीला पळवणार्या महिलेला पकडून बेदम चोपले; पूर्णेतील घटना
दरम्यान, या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल तसेच पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पंचनामा झाल्यानंतर आगीत नेमके किती आर्थिक नुकसान झाले हे समोर येईल.