परभणी - कोरोनाचा फैलाव होऊ नये, त्यामुळे संचारबंदीचे आदेश प्रशासनाने जारी केले आहेत. मात्र, असे असतानादेखील आज ईदनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी असंख्य मुस्लीम बांधवांना सोबत घेऊन आपल्या घरासमोरील मैदानात आज (सोमवार) नमाज आदा केली. या प्रकरणाची पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन आमदार दुर्रानी यांच्यासह इतर 125 जणांवर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर संचारबंदी, जमावबंदीसह आपत्ती व्यवस्थापनांतर्गत येणाऱ्या कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.
सामूहिक नमाज आदा केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये स्वतः आमदार बाबाजानी दुर्राणी (विधान परिषद सदस्य) त्यांचा पुतण्या तबरेज खान रहेमान खान दुर्राणी, तारेख खान आब्दुला खान दुर्राणी, हरून मौलाना सारोलवी, शेख जमील, शेख रशीद, छड्या अब्दुल रजाक, शेख मतीन कपडेवाला यांच्यासह इतर १०० ते १२५ आरोपींचा समावेश आहे. हे सर्व आज सकाळी एकत्र जमुन सामुहिकरित्या नमाज पठण करताना मिळून आले आहेत. या सर्वांनी कोरोना संसर्गाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करुन मानवी जीवन व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल, असे कृत्य केले आहे. संसर्ग पसरवण्याची घातक कृती केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. याशिवाय शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे.
सार्वजनिक ठिकाणी प्रार्थना करण्यास मनाई असताना घरासमोरील मोकळ्या जागेत सामुहिकरित्या नमाज पठण केले. त्यामुळे वरील आरोपींविरुध्द पाथरी पोलीस ठाण्यात कलम १८८, २६ ९, २७०, १३५ मु.पो.का, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ व अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील वरील १७ व्यतीरिक्त अन्य आरोपींची नावे निष्पन्न करण्याची कारवाई सुरू आहे, अशी माहिती आज जिल्हा पोलीस दलाच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
दरम्यान, कोरोनाचे संकट टाळण्यासाठी व त्याचा प्रसार होवु नये याची खबरदारी नागरिकांनी घ्यायला हवी. नागरिकांनी एकत्र जमू नये, सर्व धर्म गुरूंना, सर्व धार्मिक स्थळांना मंदिरे, मस्जिद, बौध्द विहारे, गुरूव्दारा, चर्च आदी धार्मिक स्थळांची नियमित देखरेख करणाऱ्यांनीच धार्मिक विधी कराव्यात. तर नागरीकांनी पुजा-अर्चा, नमाज पठन घरीच करावे. याचे उल्लंघन झाल्यास संबधीतावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यात कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारादेखील जिल्हा पोलीस दलाच्या वतीने देण्यात आला आहे.