परभणी - भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडीवर परभणीमध्ये जोरदार टीका केली आहे. महाविकास आघाडीला सत्तेत येवून एक वर्ष पूर्ण झाले. मात्र या एका वर्षात जनतेचे प्रश्न सोडवण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आल्याचे त्या म्हणाल्या. राज्य सरकारला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयश आले. तसेच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हाल झाले मात्र शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
परभणीच्या वसमत रोडवरील व्यंकटेश मंगल कार्यालायत पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. या मेळाव्याला आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, अॅड. विजय गव्हाणे, जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, प्रवीण घुगे, अभय चाटे, रामप्रभू मुंडे, समीर दुधगावकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाविकास आघाडीवर टीका
यावेळी पंकजा मुंडे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ल चढवला. हे सरकार सर्वार्थाने अपयशी सरकार आहे. गेल्या वर्षभरात या सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. कोणत्याही घटकासाठी समाधानकारक काम केले नाही. या सरकारची तीन तिघाडा काम बिघाडा, अशी अवस्था झाली आहे. कोण काय करतो, काय बोलतो, काय निर्णय घेतो, याच ताळमेळ नाही. परंतु भाजपच्या सरकारने घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयाला स्थगिती देणे हाच एककलमी कार्यक्रम या महाआघाडी सरकारने गेल्या वर्षभरात राबवला असल्याचा आरोप मुंडे यांनी केला. अनेक प्रभावी योजना, विकास कामे, शेतकरी हिताच्या निर्णयांना स्थगिती देण्यात आली आहे. शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांच्या चांगल्या निर्णयाला देखील केवळ गैरप्रकार करण्यासाठी या सरकारने स्थगिती दिल्याचा आरोपही मुंडे यांनी यावेळी केला.
'आता सरकारला स्थगिती देण्याची वेळ'
आता या सरकारलाच स्थगिती देण्याची वेळ येऊन ठेपली आहे, पदवीधर मतदारसंघातील निवडणूक ही क्रांतीकारी ठरणार असून, भाजप सरकारची मुहूर्तमेढ या विजयाने रोवल्या जाणार असल्याचे पंकज मुंडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे सर्वांनी बोराळकर यांना मददान करून विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
'महाविकास आघाडीचा उमेदवार घेतोय जातीचा आधार'
महाविकास आघाडीचा उमेदवार सर्वार्थाने अपयशी आहे. त्यांच्याकडून या निवडणुकीत केवळ जातीपातीचा आधार घेतला जात आहे. त्यांचा तो प्रयत्न कदापिही यशस्वी होणार नाही. कारण मराठा समाजाच्या आरक्षणासह विकासासाठी भाजप व मित्रपक्षांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. याउलट महाविकास आघाडीने मराठा समाजाला सर्वार्थाने वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, या गोष्टीची समाजबांधवांना जाणीव असल्यामुळे भाजपला मत मिळेल असेही त्या म्हणाल्या.
'सरकार पडेल, अशी भविष्यवाणी करणार नाही'
'सरकार पडेल, अशी भविष्यवाणी मी करू शकणार नाही. मात्र ज्यांना कोणाला जनतेचे हित हवे आहे, त्यांना हे सरकार पडावं असं वाटतं', असे पंकजा मुंडे म्हणाल्या. विशेष म्हणजे परभणीत काही दिवसांपूर्वीच भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील सरकार पडून भाजपचे सरकार दोन-तीन महिन्यात येणार असल्याचे भाकीत केले होते. याबाबत पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सावध उत्तर दिले. तसेच शिरीष बोराळकर हेच भाजपचे अधिकृत उमेदवार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.