परभणी - चार दिवसांच्या उघडीपीनंतर बुधवारी सायंकाळी जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे जिल्ह्यातल्या अनेक भागात काढणीला आलेल्या व शेतांमध्ये काढून ठेवलेल्या सोयाबीन पिकांची प्रचंड प्रमाणात नासाडी झाली आहे. या पावसाने पिकांना अक्षरश: झोडपल्याने शेतकर्यांच्या तोंडचा घास निसर्गाकडून हिरावण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही भागातील लहान मोठ्या ओढे आणि नाल्यांना पूर आला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांची तारांबळ झाली, तर शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले.
जिल्ह्यात तब्बल दहा ते बारा दिवसाच्या सततच्या पावसानंतर गेल्या चार दिवसात पावसाने उसंत घेतली होती. त्यामुळे अनेक शेतकर्यांनी पदरात पडेल ते सोयाबीन काढण्यासाठी लगबग सुरू केली. मात्र, त्यातच बुधवारी सायंकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. यात मानवत तालुक्यातील ताडबोरगाव, कोल्हा, देवलगाव अवचार, सोमठाणा, कोथाळा भागात अर्धा ते पाऊणतास तुफान पाऊस पडला. या भागात अनेक शेतकर्यांची सोयाबीनच्या काढणीची लगबग सुरू होती. परंतू, मुसळधार पडलेल्या पावसाने उभे पीक डोळ्यासमोर पाण्यात तरंगताना पाहावे लागले. तर अशीच परिस्थिती पूर्णा तालुक्यातील लिमला, वझूर व परभणीतील ईटलापूर या गावांतील होती. अचानक आलेल्या पावसाने कापलेल्या सोयाबीनच्या शेतामध्ये पाहता पाहता पाणीच पाणी करून टाकले. गेल्या काही वर्षात अल्पप्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी हैराण झाला असून, आता मात्र अतिवृष्टीमुळे हाच शेतकरी संकटात सापडला आहे.
"धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग"
यापूर्वीच जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात पाऊस बरसात असतानाच जायकवाडी धरणातून 94 हजार क्युसेकने आणि माजलगाव धरणातून 35 हजार क्युसेकने पाणी गोदावरीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे ठिक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्याप्रमाणेच येलदरी प्रकल्पातून देखील वेळोवेळी पाणी सोडल्याने पूर्णा आणि दुधना या नद्यांना पूर आला. ज्यामध्ये हजारो हेक्टर शेतात पुराचे पाणी शिरल्याने उभ्या पिकांची नासाडी झाली. त्यानंतर बुधवारी पडलेल्या पावसामुळे इतर शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी परभणी जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत.