परभणी - दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे प्रत्येकवर्षी पेरणीच्यावेळी बियाणे आणि खतांचा प्रश्न 'आ' वासून उभा राहतो. आर्थिक परिस्थितीमुळे काही वेळेला शेतकऱ्यांकडे बियाणे घ्यायलाही पैसे नसतात. अशा परिस्थितीत पाथरी येथे प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. जगदिश शिंदे हे सुमारे 200 आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या मदतीला धावून आले आहेत. त्यांनी २०० आत्महत्याग्रस्त कुटुंबाला खरीप पेरणीसाठी कापुस, तुर, मुग, बाजरी आणि मायक्रोन्यूट्रीयन्टचे बियाणे वाटप केले आहेत.
शेतकरी बांधवांनी परिस्थितीचा सामना करण्याची तयारी ठेवावी. तसेच परिस्थितीनुसार नियोजन करून मुलाबाळांच्या शिक्षण आणि आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन यावेळी डॉ. जगदिश शिंदे यांनी केले. यावेळी ओंकार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून पाथरी, मानवत, सोनपेठ व परभणी तालुक्यातील २०० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूुंबाला बियाणांचे वाटप करण्यात आले.
खरीप हंगाम जवळ आलेला असताना शेतकऱ्यांची पेरणीच्या कामासाठी लगबग सुरू झाली आहे. परंतु, दुसरीकडे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब मात्र, आर्थिक संकटात सापडले आहे. शेतात पेरणीसाठीसुद्धा त्यांच्याकडे पैसे उरलेले नाहीत. त्यामुळे ही अडचण ओळखून पेरणीसाठी बिया भरणाची मदत झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना, कापूस, तूर, मूग आधी बियाणांचे वाटप करण्यात आले. ज्यातून तब्बल 200 कुटुंबाना आधार मिळाला आहे.
यावेळी शहिद सैनिकाचे पिता तेलभरे, जन्मभूमी फाऊंडेशनचे सचिव किरण घुंबरे पाटील, डॉ. पवार, डॉ. कदम, डॉ. निकम, शिवाजीराव चिंचाने, सरपंच बालासाहेब कोल्हे, विजय कोल्हे यांची उपस्थिती होती.