परभणी - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळ वाटपाला जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. प्रत्येक लाभार्थ्याला पाच किलो तांदुळ देण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्याला 6 हजार मे. टन तांदूळ उपलब्ध करून देण्यात आला असून त्यापैकी 3 हजार 577 मे. टन मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. यात सुमारे 2 लाख 50 हजारापैकी आतापर्यंत 1 लाख 41 हजार शिधापत्रिकाधारकांना (कुटुंबांना) लाभ मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
परभणी जिल्ह्यात अंत्योदय योजनेअंतर्गत 43 हजार 879 शिधापत्रिकाधारक आहेत. तर प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत 2 लाख 5 हजार 605 आणि एपीएल शेतकरी योजनेत 56 हजार 196 शिधापत्रिकाधारक आहेत. या तीनही योजनांतर्गत 3 लाख 5 हजार 680 इतके कुटुंब असून त्या अंतर्गत लाभार्थी संख्या 14 लाख 52 हजार 932 आहे. नियमित धान्याचे वाटप जवळपास 90 टक्के झाले असुन, 6 हजार 150 मे. टन धान्य लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहे, अशीही माहिती देण्यात आली.
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ देण्यात येत आहे. ज्या शिधापत्रिकेत पाच नावे आहेत, त्यांना 25 किलो तांदूळ देण्यात येत आहे. यामध्ये अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेत मोडणाऱ्या कार्डधारकांनाच धान्य देण्यात येत आहे. मोफत तांदूळ योजनेत एपीएल योजनेत मोडणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचा समावेश नाही. जिल्ह्यासाठी 6 हजार मे. टन तांदूळ प्राप्त झाला असून तो सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना वितरीत झाला आहे. एकूण 3 हजार 577 मे. टन (59 टक्के) धान्य वितरीत करण्यात आले आहे. उर्वरीत देखील टप्प्याटप्प्याने स्वस्त धान्य दुकानदारांना तांदूळ वाटप करण्यात येत आहे.
मोफत तांदूळ वाटप चालू होत असताना प्रत्येक प्रत्येक गावात तशी पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. कोणते धान्य नियमित आहे आणि कोणता तांदूळ मोफत देण्यात येत आहे, याची नागरिकांना सूचना देणे आवश्यक आहे. नाही तर नियमित धान्य वाटप व मोफत तांदूळ वाटपात गोधळ होवू नये, यासाठी गावातील ग्राम दक्षता समिती तसेच शासकीय प्रतिनीधी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जागरुक युवकांनी व नागरिकांनीसुध्दा याकडे लक्ष दिल्यास वाटपात गैरव्यवहार होणार नाहीत, असेही आदेश जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिली.
जिल्ह्यातील उर्वरित एपीएल केशरी शिधापत्रिका 78 हजार 119 असुन त्यावरील 3 लाख 36 हजार 771 लाभार्थ्यांसाठी मे आणि जून या दोन महिन्यासाठी प्रतिमहा गहू 1 हजार 10 मे. टन व तांदूळ 674 मे.टन नियतन शासनाकडून प्राप्त झाले आहे. हे धान्य प्रति लाभार्थी 3 किलो गहू 8 रुपये प्रति किलो दराने व प्रति लाभार्थी 2 किलो तांदूळ 12 रुपये प्रति किलो दराने मे आणि जून या दोन महिन्यात रास्तभाव दुकानदारामार्फत लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी, परभणी यांनी सांगितले.