परभणी - संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या कोरोनाचा सामना करण्यासाठी परभणी महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यालयांमध्ये फवारणी करण्याचे काम आजपासून सुरू झाले. यासोबतच शहरातील प्रमुख बाजारपेठ तसेच विविध कॉलण्यांमधील रस्त्यांवरही निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज(मंगळवारी) परभणी शहरातील महानगरपालिकेच्या इमारतीत निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. इमारतीच्या आतील प्रत्येक दालनात, प्रवेशद्वारात तसेच बाहेरच्या परिसरात ही फवारणी झाली. याशिवाय शहरातील शिवाजी चौक भागात सर्व रस्त्यांवर फवारणी करण्यात आली आहे. तसेच गांधी पार्क, क्रांती चौक, स्टेशन रोड आदी भागात देखील ही फवारणी दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू होती.
तत्पूर्वी जिल्हा सरकारी दवाखाना आणि शिवाजी चौक तसेच विष्णू नगर आदी भागात ही फवारणी करण्यात आल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांनी दिली आहे. फवारणीसाठी आयुक्त रमेश पवार, जीवशास्त्रज्ञ विजय मोहरीर हे मार्गदर्शन करत असून, स्वच्छता कर्मचारी यासाठी प्रभागांमध्ये फिरून फवारणीचे काम करत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - परभणीत आता दुचाकी, चारचाकी धावणार नाहीत; बांधकामांवरही बंदी
हेही वाचा - 'कोरोना'ची दहशत ! परभणी जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद - जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश