परभणी - जिल्ह्यातील धनगर समाजाच्यावतीने आज आरक्षणाच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजाच्या आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या 18 वर्षीय योगेश कारके याच्या कुटूंबियांना न्याय देण्यात यावा, तसेच पाथरी तालुक्यातील रेणापूर येथील समाजाची हरवलेली स्मशानभूमी शोधून द्यावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.
धनगर समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देत आहे. या अंतर्गत राज्यभर मोठे आंदोलने झाली. यामध्ये धनगर समाजातील योगेश कारके हा तरुण शहीद झाला. मात्र अद्यापही शासनाकडून त्याच्या कुटूंबियांना न्याय मिळाला नाही. तसेच समाजाच्या इतर प्रश्नावरून कार्यकर्ते लढा देत आहे. मात्र, शासन त्यांची दखल घेत नसल्याने हा समाज संतप्त झाला आहे.
'10 लाख मदत, सरकारी नौकरीचे आश्वासन पूर्ण नाही'
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी 12 ऑगस्ट 2018 रोजी शहीद झालेल्या गोमेवाकडी (ता.सेलू) येथील शहीद योगेश कारकेच्या कुटूंबियास 10 लाख रुपयाची आर्थीक मदत व एकास शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन प्रशासनाकडून मिळाले होते. मात्र, याबाबत अद्यापही प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही. या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने या आंदोलनात कारके कुटुंबीय देखील सहभागी झाले होते.
'..अन्यथा रस्त्यावर उतरून लढाई करावी लागेल'
धनगर समाजाला मिळालेल्या आत्तापर्यंत कुठल्याही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. कारके कुटुंबियांना ही न्याय मिळाला नाही. तर पाथरी तालुक्यातील रेणापुरच्या स्मशानभूमीचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे येणाऱ्या एका महिन्यात हे प्रश्न सोडवले नाहीत, तर रस्त्यावर उतरून लढाई करण्याचा इशारा समाजाचे नेते सखाराम बोबडे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिला आहे.