परभणी - मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी परभणी जिल्ह्यातील ज्या शिवारात येऊन शेतकऱ्यांना 25 आणि 50 हजार रुपये मदत सरकारने द्यावी, अशी मागणी केली होती. त्याच शिवारात आज (मंगळवारी) येऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी त्यांना त्याच मदतीची आठवण करून दिली आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यावेळी मागणी केलेली मदत शेतकऱ्यांना द्यावी, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
याच मागणीचा धागा पकडून आज फडणवीस यांनी त्याच शिवारात पाहणी करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या मागणीची आठवण करून दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमच्या मागच्या सरकारच्या काळात आम्ही बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली. त्याचबरोबर अन्य शेतकऱ्यांनाही 50 टक्के नुकसान भरपाई दिली होती. यावर्षी आता मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे जवळपास शंभर टक्के नुकसान असून, या सरकारने आता सरसकट मदत जाहीर करायला हवी. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा कापूस भुईसपाट झाला आहे. सोयाबीनच्या गंजी देखील अतिवृष्टीच्या आणि पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. अशी परिस्थिती असताना सरकारने शेतकऱ्यांकडे गांभीर्याने पाहून तत्काळ मदत द्यायला पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.
यावेळी त्यांच्यासोबत आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, आनंद भरोसे व भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली सोनपेठच्या निळा शिवारात बाधित शेताची पाहणी