परभणी - तालुक्यातील मुरूंबा येथे दोन दिवसात कोंबड्यांसह अन्य सुमारे 1 हजार पक्षांचा मृत्यू झाल्याने बर्डफ्लूचा धोका निर्माण झाला की काय? अशी भीती व्यक्त होत आहे. शिवाय परभणीतील नारायण चाळ परिसरातदेखील शुक्रवारी अज्ञात आजाराने 3 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने त्यात आणखी भर पडली. या पार्श्वभूमीवर परभणीतील पशुसंवर्धन विभागाच्या तज्ज्ञांनी सदर कोंबड्यांचा व्हीसेरा, स्वॅब आणि इतर शारीरिक घटकांचे नमुने गोळा करून पुणे येथे तपासणीसाठी पाठविले पाठविले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार कोंबड्यांना वेळेवर खाद्य न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा. मात्र, असे असले तरी प्रत्यक्षात अहवाल प्राप्त झाल्यानंतरच खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले.
मुरूंबा गाव आणि 5 किमीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर
जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मुरूंबा हे गाव व 5 किमी चा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुरुंबा गावात सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत गावातील कुकूट पक्ष्यांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा, प्रदर्शन तसेच पशुपक्ष्यांच्या अवागमनासदेखील आज शुक्रवारपासून प्रतिबंध घातला आहे. शिवाय मुरुंबा आणि परिसरातील 5 किमी परिसरात संसर्ग पसरू नये म्हणून, हा परिसरदेखील प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
पुण्याच्या अहवालाची प्रतीक्षा
कोंबड्यांचा एकामागोमाग एक मृत्यू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पशूसंवर्धन विभागाचे पथक मुरूंबा येथे 2 दिवस तळ ठोकून होते. मृत्यू पावलेल्या पक्ष्यांचे नमुने त्यांनी तपासणीसाठी पुणे येथे पाठवले आहेत. मात्र, अद्याप मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही. देशातील अन्य भागात बर्डफ्लूचा धोका वाढल्याचे दिसून येत आहे. हा आजार एव्हीयन इन्फ्लूएन्झा व्हायरसद्वारे होतो. मात्र, मुरुंबा येथील कोंबड्यांच्या मृत्यू मागे त्यांना खाद्यान्न वेळेवर न मिळाले असावे, किंवा कमी मिळाले असावे, त्यामुळे उपासमारीने या कोंबड्यांचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. परंतु देशातील अन्य भागात धोका वाढत असल्याने यासंदर्भात तज्ज्ञांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच पुणे येथून अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यू मागचे खरे कारण स्पष्ट होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
'या' अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली
मुरूंबा या गावात आतापर्यंत शेकडो कोंबड्यांसह इतर पक्षी मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाचे पथक हा प्रकार नेमका कशाचा आहे, याबाबत शोध घेत आहे. पुणे येथील प्रयोगशाळेत नमुने पाठवण्यासाठी जिल्हा परिषदेचे जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. अशोक लोणे, तालुका पशूसंवर्धन अधिकारी डॉ. के. बी. तांबे, डॉ. गिरीश लाटकर यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली. तसेच जिल्ह्यातील अन्य भागात पक्षी मृत अवस्थेत आढळून आल्यास पशूसंवर्धन विभागास तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.