परभणी - परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावे, या मागणीसाठीचा लढा यापुढे अधिक तीव्र करणार, असा निर्धार परभणीतील बी.रघुनाथ सभागृहात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आला. परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे, या मागणीसाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांपासून जिल्हाभर वेगवेगळे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून बी. रघुनाथ सभागृहात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो हे होते.
यावेळी बोलताना काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू असून महाविद्यालयाची घोषणा विधिमंडळाच्या सभागृहात झालेली आहे. मात्र, महाविद्यालय सुरू करण्यासाठी जनआंदोलनाचा रेटा वाढवावा लागेल. आंदोलनात खंड पडू देऊ नका, असे सांगत लोकप्रतिनिधींच्या घरावर जनतेने मोर्चे काढावेत, असे आवाहनही आमदार वरपुडकर यांनी केले.
'पुढील लढाईतही सक्रिय सहभाग घ्या'
या प्रसंगी बोलताना खासदार संजय जाधव म्हणाले की, सर्व निकषात बसत असतानाही परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दिले जात नाही. हा परभणीकरांवर अन्याय आहे. महाविद्यालय मिळविण्यासाठी सध्या राबविण्यात येत असलेल्या स्वाक्षरी मोहिमेला जनतेतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील शेवटच्या माणसाला वाटलं पाहिजे की, मी सुद्धा या लढाईत होतो, म्हणून ही स्वाक्षरी मोहीम राबविली जात आहे. आपल्या हितासाठी परभणीकर नेहमी एकजूट दाखवतात, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. यापुढील लढाईत सर्वांनी सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहनही खासदार जाधव यांनी केले.
'एकजुटीने प्रयत्न करावेत'
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी म्हणाले की, परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार करून राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी. परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. तसेच माजी आमदार सुरेश देशमुख यांनी सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रयत्न करावेत. कोणत्याही लढाईसाठी आम्ही तयार असल्याचे सांगितले.
विविध मान्यवरांनी व्यक्त केली भावना
या प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी फुसके नको तर जिल्हाभर चक्काजाम आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घ्या, असे सांगितले. तर माजी महापौर प्रताप देशमुख यांनी सांगितले की, परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आम्ही खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची भेट घेतलेली आहे. आता व भविष्यात सर्वांनी एकजुटीने आंदोलनात सहभागी व्हावे, असेही ते म्हणाले. अध्यक्षीय समारोप करताना भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो म्हणाले की, आंदोलनाने कोणत्याही विकासाची गोष्ट शक्य असते. तेव्हा परभणीकरांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आंदोलनात एकजुटीने सहभागी व्हावे.