परभणी : मागील 3 दिवसांपासून परभणी शहर आणि आसपासच्या 5 किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू आहे. याचा कालावधी उद्या (सोमवार) संपणार होता. मात्र, त्यापुर्वीच आज (रविवार) मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील जिंतूर आणि सोनपेठ शहर तसेच 3 किलोमीटरच्या परिसरात संचारबंदी करण्यात आली आहे. याशिवाय परभणी शहरातील गव्हाणे चौक आणि गंगापुत्र कॉलनी हा परिसर देखील प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या परिसरात संचारबंदी लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जारी केले आहे.
परभणी शहरात गुरुवारी एकाच दिवशी चार रुग्ण आढळून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी मध्यरात्रीपर्यंत परभणी शहर आणि पाच किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू केली होती. त्यानंतर आज रविवारी सुट्टी असल्याने बाजार उघडू नये, असे आदेश दिले होते. त्याप्रमाणे परभणी शहरात गेल्या चार दिवसांपासून कडकडीत संचारबंदी पाळण्यात आली. ही संचारबंदी आज मध्यरात्री उठत नाही, तोच पुन्हा शहरातील गव्हाणे चौक व गंगापुत्र कॉलनी या भागांत आणि जिंतूर व सोनपेठ शहरांमध्ये संचारबंदी लागू झाली आहे.
रविवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून मंगळवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. दरम्यान, आज परभणी जिल्हा रुग्णालयाच्या एक्स-रे विभागातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तो रहिवासी असलेल्या गंगापुत्र कॉलनीला सील करून त्याठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याशिवाय शहरातील गव्हाणे चौकातील घरकाम करणाऱ्या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर महिला अनेकांच्या घरात कामाला जात असल्याने ती अनेकांच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण गव्हाणे चौकात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, जिंतूर येथील बामणी प्लॉट भागाच्या नगरसेवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे हे नगरसेवक नेमके कोणा-कोणाच्या संपर्क आले, याचा शोध घेतला जात आहे. तर या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिंतूर शहर आणि 3 किलोमीटर परिसरात संचारबंदी लावण्यात आली आहे.
याप्रमाणे सोनपेठ शहरातील राज गल्ली या भागात कोरोनाबाधित आढळून आल्याने संपूर्ण सोनपेठ शहर आणि 3 किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीत अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. त्यात औषधी दुकान, सरकारी व खाजगी दवाखाने, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी, परवाने घेतलेले वाहन, गॅस वितरक, प्रसार माध्यमे, पेट्रोलपंप चालकांना मुभा आहे. तर, दुध विक्रेत्यांना सकाळी 6 ते 9 या कालावधीत परवानगी आहे. तसेच खत, बि-बियाणे विक्रेत्यांना मुभा राहणार असून, राष्ट्रीयकृत बँकांना केवळ स्वस्त धान्य दुकानांचे चालन भरण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.