परभणी- कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विळखा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी धास्ती घेतली आहे. नागरिक खबरदारी म्हणून घरातच बसणे पसंत करत आहेत. तर कामानिमित्त शहरात गेलेले नागरिक, विद्यार्थी गावाकडे येत आहेत. त्याचा परिणाम एसटी महामंडळ, खासगी वाहतुकीवर झाला आहे. सध्या प्रवासी मिळत नसल्याने एसटी महामंडळ, खासगी वाहतुकीचे मोठे नुकसान होत आहे.
कोरोना विषाणूचा धसका संपूर्ण जगाने घेतला आहे. भारतात या संदर्भाने मोठी काळजी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने शाळा, महाविद्यालय, मॉल, चित्रपटग्रह आणि गर्दी होणाऱ्या व्यवहार आणि पर्यटन स्थळांवर बंदी घातल्याने सर्वत्र शुकशुकाट झाला आहे. त्यामुळे सहाजिकच त्याचा प्रभाव प्रवासी वाहतुकीवर दिसून येतो. परभणीच्या रेल्वे आणि बस स्थानकात लांब पल्ल्याचे प्रवासी दिसत नाहीत. शाळांना सुट्टी लागल्याने अनेक विद्यार्थी गावाकडे येत आहेत.
दरम्यान, कोरोनाचा प्रभाव होवू नये, म्हणून बस गाड्या आतून बाहेरून स्वच्छ धुवून घेण्यात येत आहेत. यामुळे दुपारी एक ते पाच या वेळेत एसटी स्थानकात होणारी अधिक गर्दी कमी झाली आहे. निम्म्याहून अधिक प्रवासी वाहतूक घटली आहे. त्यामुळे मंगळवारपासून काही प्रवासी बस फेऱ्या रद्द करण्यात येणार असल्याची माहिती परभणी आगार प्रमुख दयानंद पाटील यांनी दिली. तसेच रेल्वे प्रवासी वाहतुकीवर देखील याचा परिणाम जाणवला आहे. एरवी भरुन जाणाऱ्या रेल्वे आता तुरळक प्रवासी घेऊन धावत आहेत.
पुण्याहून गावाकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. पुण्यामध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने त्या ठिकाणी परभणीतून वास्तव्यास गेलेल्या नोकरदार, मजूर तसेच विद्यार्थीवर्ग आपल्या घरी परतू लागला आहे. येणाऱ्या पंधरा दिवसांच्या सुट्टयांच्या पार्श्वभूमीवर पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या दुप्पट झाली आहे. ज्याचा परिणाम पुण्याहून येणाऱ्या खाजगी बसेससाठी तब्बल हजार ते बाराशे रुपये तिकीट आकारणी होत आहे. याउलट परभणीहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या नसल्याने खाजगी बसचे तिकीट केवळ दोनशे ते तीनशे रुपये झाल्याचे ट्रॅव्हल संघटनेचे संभानाथ काळे यांनी सांगितले.