परभणी - भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाई केल्यामुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरात नागरिकांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून जोरदार घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.
पाकिस्ताने पोसलेल्या दहशतवाद्यांनी १४ फेब्रुवारीला काश्मीरमधील पुलवामा येथे भारतीय लष्करावर भ्याड हल्ला केला. यांचा संपूर्ण देशातून संताप व्यक्त होत होता. देशवासियांमध्ये बदल्याची भावना तीव्र झाली होती. पाकिस्तानला धडा शिकवण्याची सर्व स्तरातून मागणी होत होती. अखेर त्याचा भारतीय हवाई दलाने बदला घेतला. हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास नियंत्रण रेषा ओलांडून मिराज विमानातून हल्ला केला. यामध्ये दहशतवादी संघटनेचे मुख्यालय उद्धवस्त केले गेले. त्यामुळे शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. येथील शिवाजी चौकात, गांधी पार्क आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ फटाके फोडण्यात आले.
शहरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह संभाजी सेना, व्यापारी संघटनेच्यावतीने शिवाजी चौकात तर शिवसेनेच्या युवासैनिकांनी गांधी पार्क भागात फटाके फोडले. तसेच दोन्ही ठिकाणी साखर आणि पेढेदेखील वाटण्यात आले. या प्रमाणेच सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात सामान्य नागरिकांसह विविध संघटना, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटले. यावेळी 'भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद', अशा घोषणा देण्यात आल्या.