परभणी- सेप्टिक टँक साफ करताना अनेकदा मजुरांचा मृत्यू होतो. अशीच घटना परभणीत घडली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार सेप्टिक टँक साफ करण्यासाठी गेलेल्या पाच मजुरांचा मृत्यू झाला आहे. गुदमरून मजुरांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मजुरांना सेप्टिक टँकमध्ये काम करताना पुरेशी सुरक्षा साधने असण्याची गरज होत आहे.
ही घटना परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील भाऊंचा तांडा येथे घडली आहे. भाऊचा तांडा येथे विठ्ठल मारोती राठोड यांच्या फार्म हाऊसवर गुरुवारी दुपारपासून काही जण सेफ्टी टॅंक स्वच्छ करीत होते. सायंकाळी 8 वाजताच्या दरम्यान टॅंकमध्ये जाणारे मध्येच बेशुद्ध पडत असल्याचेएका व्यक्तीच्या लक्षात आले. ही घटना त्यांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने सेफ्टी टॅंक फोडून 6 जणांना बाहेर काढले. यात 5 जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर परळी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही आहेत मृत व जखमींची नावे- शेख सादेक (वय 45) त्यांचा मुलगा शेख शाहरुख (वय 20 )त्यांचा जावाई शेख जुनेद ( वय 29 ) जावेदचा भाऊ शेख नविद (वय 25 ) चुलतभाऊ शेख फिरोज वय( 19 )अशी मृतांची नावे आहेत. शेख साबेर ( वय 18) हा गंभीर जखमी झाला आहे.
सेफ्टी टॅंकमध्ये गॅस ठरला मृत्यूचे कारण? पाच जणांचे मृतदेह परभणी शासकीय रुगणालयात शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. यात बाप, लेक, जावई, आणि एका चुलत भावाचा मृतांमध्ये समावेश आहे. हे सर्व जण सोनपेठ शहरातील रहिवाशी आहेत. या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली आहे, सेफ्टी टॅंकमध्ये गॅस तयार होऊन मजूर मृत झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करू-रात्री अकरा वाजता पाच व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. आमच्या समाजाला कोणतीही सुविधा नसताना काम करतात. या मृत्यूसाठी सरकार जबाबदार आहे. मृत व्यक्तींच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला सरकारने नोकरी द्यावी. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र मुस्लिम मेहतर भंगी साफसफाई संघटेनेचे अध्यक्ष शेख सज्जन यांनी दिला आहे.
2 मार्च 2023 ला पुण्यात झाली होती दुर्घटना -पुण्यातील लोणी काळभोरमधील एका घरात सेप्टिक टँक साफ करताना गुदमरून चौघांचा मृत्यू ( Four People Died in Pune ) झाला. ही घटना 2 मार्च 2023 ला घडली होती. कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन परिसरातील प्यासा हॉटेलच्या पाठीमागे घडली. ही घटना सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे लोणी काळभोरसह कदमवाकवस्ती परिसरात एकच खळबळ उडाली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.
हेही वाचा-