परभणी - जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या नांदेड, हिंगोली आणि जालना या तीनही जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यामुळे परभणी महानगरपालिका आणि जिल्ह्यातील नगर पालिका क्षेत्र तसेच त्यांच्या पाच किलोमीटर परिसरात बुधवारी मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी पुढील दोन दिवस राहणार आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर कुठलेही वाहन किंवा व्यक्ती रस्त्यांवर फिरणार नाही, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी परभणी जिल्ह्यात मागच्या गुरुवारी आढळून आलेल्या एका कोरोनाग्रस्त रुग्णामुळे 17 ते 19 एप्रिल दरम्यान तीन दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, ही संचारबंदी केवळ परभणी महानगरपालिका आणि परिसरातील तीन किलोमीटर क्षेत्रात लावण्यात आली होती. यावेळी संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी करण्यात आली आहे.
परभणी महानगरपालिकेच्या हद्दीशिवाय परिसरातील पाच किलोमीटर परिक्षेत्रात तर सर्व महानगर पालिकांच्या क्षेत्रासह परिसरातील तीन किलोमीटर परिक्षेत्रात बुधवारी 22 एप्रिलच्या मध्यरात्री 12 वाजेपासून ते 24 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. 'कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात इतर लोकांनी येऊ नये, म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सार्वजनिक अथवा खासगी जागेमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तीने एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे, असे असले तरी परभणी जिल्ह्यात अनेक जण मनाई असताना देखील दुचाकी आणि चारचाकी वाहनातून अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय आपत्कालच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरत असल्याचे आढळून येत आहेत. या बेशिस्त लोकांवर नियंत्रण करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी म्हटले आहे. त्यामुळेच ही संचारबंदी आपण जाहीर करत असल्याचे त्यांनी बुधवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
हेही वाचा - ...अन् रुग्णवाहिका घेऊन पळाला रुग्ण; जिल्हा सामान्य रुग्णालयात खळबळ
परभणी जिल्ह्याला लागून असलेल्या नांदेड, हिंगोली आणि जालना या तीनही जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत ग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लोकांनी आपल्या घरातच बसून राहणे आवश्यक आहे. ज्यामुळे पुढील दोन दिवस जिल्ह्यात कलम 144 अंतर्गत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे."यांना संचारबंदी तून सूट"सदर दोन दिवसांच्या संचारबंदीतून शासकीय कार्यालय त्यांचे कर्मचारी आणि वाहनांना सूट देण्यात आली आहे. याशिवाय दवाखाने, औषधे दुकान त्यांचे कर्मचारी, शासकीय निवाराग्रह, अन्नवाटप करणाऱ्या सेवाभावी संस्था आणि त्यांची वाहने आणि अत्यावश्यक सेवेसाठी परवाना घेतलेली वाहने आणि व्यक्ती तसेच वैद्यकीय आपातकाल, गॅस वितरण, मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे संपादक, वार्ताहार, प्रतिनिधी आणि वृत्तपत्र वितरकांना या संचारबंदीतून सूट आहे. याप्रमाणे पेट्रोल पंप, खत वाहतूक, गोदामे आणि दुकानदार, त्यांच्यासाठी लागणारी वाहने, कामगारांना देखील सूट असणार आहे. तर दूध विक्रेत्यांना सकाळी 6 ते 9 यावेळेत घरोघरी दूध वाटप करण्याची मुभा देण्यात आली आहे.