परभणी - शहरात गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने तत्काळ संचारबंदी लागू केली आहे. आजपासून (शुक्रवारी) तीन दिवस ही संचारबंदी असणार आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी सहा वाजल्यापासूनच पोलिसांनी शहरातील सर्व रस्ते, नगर, कॉलनीसह महामार्गावर तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. केवळ अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या लोकांना रस्त्यांवर येण्याची मुभा असून विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईस तोंड द्यावे लागत आहे. ज्यामुळे संपूर्ण शहरात शुकशुकाट दिसत आहे.
अगदी सुरुवातीपासून परभणी जिल्हा कोरोनाच्या बाबतीत ग्रीन झोन मध्ये होता. शहराच्या तसेच जिल्ह्याच्या सीमा सर्वप्रथम बंद करणारा परभणी जिल्हा त्यामुळे या विषाणूपासून अलिप्त राहिला. मात्र गुरुवारी शहरातील औद्योगिक वसाहतीच्या परिसरात 21 वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आणि एकच खळबळ उडाली. यामुळे खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने परभणी महानगरपालिका क्षेत्रासह परिसरातील तीन किलोमीटर क्षेत्रात संचारबंदी लागू केली. त्यामुळे आज, उद्या आणि परवा अशी तीन दिवस संचारबंदी असणार आहे. या काळात कुठल्याही परिस्थितीत रस्त्यावर फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. केवळ अत्यावश्यक असलेल्या वैद्यकीय सेवा, स्वच्छता कर्मचाऱ्यांना रस्त्यावर येण्याची मुभा आहे.
संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने आज सकाळी 6 वाजल्यापासून शहरात तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. प्रत्येक चौकात कॉलनी आणि नगरांच्या तोंडावर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांकडून कसून चौकशी होत आहे. विनाकारण फिरणारा आढळल्यास त्याला पोलिसांच्या कारवाईस तोंड द्यावे लागत आहे. ज्यामुळे परभणी शहरात केवळ वैद्यकीय सेवा, स्वच्छता कर्मचारी आणि काही अन्न वाटप करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे वाहने फिरताना दिसून येत आहेत.
तसेच दररोज सकाळी 7 ते 11 या दरम्यान उघडी राहणारी परभणी शहरातील मुख्य बाजारपेठ शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, स्टेशन रोड, वसमत रोडवरील काळी कमान, जुना पेडगाव रोड, गंगाखेड रोड आणि पाथरी रोडवरील दुकाने कडकडीत बंद आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाट निर्माण झाला असून हीच परिस्थिती पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. यामुळे कोरोनाच्या संसर्गाची चैन कुठेतरी तुटेल, आणि हा महाभयंकर विषाणू पसरणार नाही, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाला आहे.