परभणी - कडक शिस्तीच्या आणि कठोर सनदी अधिकारी म्हणून ओळख असलेल्या आंचल गोयल या परभणी जिल्हाधिकारीपदी रुजू होऊ नयेत म्हणून, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात राजकीय शक्ती पणाला लावली होती. मात्र जनतेच्या मागणीमुळे शासनाला परभणीच्या जिल्हाधिकारी म्हणून गोयल यांची नियुक्ती कायम ठेवावी लागली आणि अखेर त्या आज (गुरुवारी) परभणीत रुजू झाले आहे.
...त्या अखेरच्या दिवशी घडले राजकीय नाट्य
परभणीचे तत्कालीन जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर हे 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. तत्पूर्वी 13 जुलैला परभणीच्या जिल्हाधिकारी म्हणून आंचल गोयल या आयएएस अधिकार्यांची नियुक्ती राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार त्या पदभार घेण्यासाठी 27 जुलैलाच परभणीत दाखलही झाल्या होत्या. आगामी काळात परभणीत काम करायचे म्हणून त्यांनी परभणी जिल्ह्याचा आढावा घेण्याचे काम देखील सुरू केले. मात्र, या नियुक्तीमध्ये राजकीय हस्तक्षेप झाला. गोयल यांना पदभार न देता राज्य शासनाकडून या ठिकाणचे अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर यांना पदभार देण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी मुगळीकर यांना प्राप्त झाले. त्यानुसार त्यांनी निवृत्तीचा निरोप घेतांना काटकर यांच्याकडे आपली सूत्रे सोपवली.
गोयल यांना 8 महिन्याचे बाळ घेऊन परतावे लागले
दरम्यान, गोयल यांना स्वतंत्र नियुक्ती मिळाल्यामुळे त्या काम करण्याच्या उत्साहात परभणीत आल्या होत्या. मात्र अखेरच्या दिवशी घडलेल्या राजकीय नाट्यामुळे त्यांना रुजू होता आले नाही. परिणामी त्या आपल्या आठ महिन्याच्या बाळासह 31 जुलैला संध्याकाळी मुंबईला परतल्या. त्यानंतर हा विषय परभणीकरांसाठी एका आयएएस महिला अधिकाऱ्याचा अपमान म्हणून मोठा संतापजनक ठरला. त्यामुळे याप्रकरणी संतप्त सामान्य परभणीकरांनी आवाज उठवला होता.
माध्यमे आणि सामान्य नागरिकांनी उठवला आवाज
सनदी महिला अधिकार यांच्या सोबत असा राजकीय डाव खेळून त्यांच्यावर अन्याय केल्याचा प्रकार माध्यमांसह सामान्य परभणीकरांना देखील पटला नाही. त्यामुळे याप्रकरणी माध्यमांमध्ये जोरदार चर्चा झाली. तसेच जागरुक नागरिक मंचच्या झेंड्याखाली एकत्र येऊन नागरिकांनी जोरदार आंदोलन केले. ज्याचा परिणाम शासनाला आपला निर्णय कायम ठेवून गोयल यांना परभणीत रूजू करून घ्यावे लागले.
रुजू होताच राज्यपालांच्या दौऱ्याचा घेतला आढावा
गोयल यांनी मंगळवारी मुंबईतून विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून परभणीच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला होता. मात्र, आज गुरुवारी त्यांनी प्रत्यक्ष परभणी दाखल होऊन अधिकृत पदभार स्वीकारला. तत्पूर्वी, त्यांनी सकाळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात जाऊन उद्या (शुक्रवारी) परभणीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा होणाऱ्या दौऱ्याचा आढावा घेतला.
कोण आहेत आंचल गोयल?
आंचल गोयल यांना 2014 साली आयएएस झाल्यानंतर महाराष्ट्र कॅडेर मिळाले. अकोला जिल्ह्यात 2015-16 मध्ये त्यांनी परिविक्षाधिन कालावधी पूर्ण केला. केंद्र शासनाच्या पेट्रोलीयम नॅचरल गॅस विभागामध्ये सहायक सचिव म्हणून कार्य केले. पहिली नियुक्ती नोव्हेंबर 2016 पासून पालघर जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. मे 2018 पासून रत्नागिरी येथे जिल्हा परिषदेत अठरा महिने मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. तर परभणी जिल्हाधिकारी पदावर रुजू होण्यापूर्वी त्यांनी सहव्यवस्थापकीय संचालक, राज्य फिल्म, सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबई येथे कार्य बजावले.
चंदीगड येथे झाले शिक्षण
आंचल गोयल यांचा जन्म पंजाब राज्यात 1 जुलै 1990 रोजी झाला आहे. त्यांचे शिक्षण चंदीगड येथे झाले असून, बीई ईलेक्टॉनिक्स पदवी सन 2012 मध्ये मिळविली आहे. सन 2013 मध्ये आयकर विभागात निवड झाली होती. आई-वडील बॅकींग क्षेत्रात आहेत. तर पती निमित गोयल 2014 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.