परभणी - जिंतूर आगारातील ( Jintur Agar ) बसचालक मुजफ्फर खान जाफर खान यांनी भोगाव शिवारातील विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. 40 वर्षीय मुजफ्फरखा उर्फ मुज्जू यांचे प्रेत शनिवारी (दि. 12 मार्च) दुपारी जिंतूरच्या आमदार कॉलनीतील विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
'तारीख-पे-तारीख' ला वैतागले - तब्बल 4 महिने 10 दिवसांपासून एसटीचा संप सुरू आहे. या संपामुळे मुजफ्फर खान कर्जबाजारी झाले होते. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांबाबत 11 मार्च रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होती. न्यायालयात काय निर्णय लागेल, याची ते वाट पाहत होते. पण, मागील 4 महिन्यांपासून तारीख पे तारीख मिळत आहे. त्यानुसार 11 मार्चलाही या प्रकरणीत काहीही निर्णय झाला नाही. 22 मार्चची पुन्हा नवीन तारीख न्यायालयाने दिली. हे ऐकल्यावर मुजफ्फरखा निराश झाले होते. न्यायालयाचा निर्णय काय येईल याची उत्सुकता होती. न्यायालयाची तारीख पुन्हा वाढल्याचे 11 मार्चला दुपारी 4 वाजता कळताच जिंतूर बस स्थानकावरून मुजफ्फरखा निघाले. सायंकाळी भोगाव शिवारातील गोमा खिल्लारे यांच्या विहिरीवर पोहोचून त्यांनी विषारी द्रव्य प्राशन करून विहिरीत उडी मारली. शनिवारी (दि. 12 मार्च) दुपारच्या दरम्यान मुजफ्फरखा यांचे प्रेत आढळून आले.
'एसटी प्रशासनावर गुन्हा दाखल करा' - आत्महत्येची खबर पसरताच प्रेत आढळलेल्या भोगाव देवी शिवारातील विहिरीवर गर्दी झाली होती. प्रेत विहिरीतूनबाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी शहरातील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी नातेवाईकासह एसटीचे संपकरी कमर्चारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी जमलेल्या जमावाकडून एसटी प्रशासनावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशा घोषणाही देण्यात आल्या. मृतास पत्नी दोन मुले, दोन भाऊ व आई, वडील असा परिवार आहे.