परभणी - जिंतूर तालुक्यातील चारठाणा परिसरात आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान एका धावत्या खासगी बसने पेट घेतला. काही वेळातच आग मोठ्या प्रमाणात भडकली. याआगीत संपूर्ण जळून खाक झाली आहे. बस चालकाने वेळीच सतर्कता दाखवल्याने या बसमधील 12 प्रवासी बचावले आहेत.
औरंगाबादहून हिंगोलीकडे जात होती बस -
औरंगाबाद येथून हिंगोलीकडे 12 प्रवासी घेऊन जाणारी सिटी लिंक या खासगी कंपनीची ही बस होती. आज (शुक्रवारी) सकाळी आठ वाजेच्या दरम्यान या बसमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे सांगण्यात येते. हा प्रकार लक्षात येतात चालकाने रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवून प्रवाशांना पटापट उतरण्यास सांगितले.
प्रवाशांचे समान जाळून खाक -
बसला लागलेली आग वरचेवर भडकत होती. ज्यामुळे प्रवाशांना आपल्या बॅगा देखील घेण्याची संधी मिळाली नाही. वाहनामध्ये बॅगा तशाच सोडून प्रवासी खाली उतरले. त्यानंतर आगीचा जोरदार भडका उडाला. यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. तसेच प्रवाशांचे सामान आणि बॅगा देखील जळाल्याचे प्रवाशांनी सांगितले.
पंचनामा सुरू -
सकाळी 9.30 वाजता जिंतूर आणि चारठाणा पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली. ही घटनेमुळे एक ते दीड तास या रस्त्यावरची वाहतूक खोळंबली होती. तसेच पेटती बस पाहण्यासाठी बघ्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.