परभणी - जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील एकुण 81 पैकी 28 उमेदवारांनी माघार घेतली. तर 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विशेष म्हणजे या चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रस्थापित उमेदवारांना पुढे त्या-त्या पक्षातील बंडखोरांचे आव्हान कायम आहे. विरोधी उमेदवारांसोबतच या 'बंडोबां'चा देखील त्यांना सामना करावा लागणार आहे.
हेही वाचा- पुणे जिल्ह्यात 'बंडोबा' होणार का 'थंडोबा'..?
दरम्यान, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या सर्व बंडोबांना थंड करण्यात प्रस्थापित पक्षांचे उमेदवार अपयशी ठरले आहेत. आता त्यांना निवडणुकीच्या रणांगणात विरोधकासोबतच स्वकीय बंडखोरशी दोन हात करावे लागणार, हे निश्चित.
हेही वाचा- भुसावळ्यात सामूहिक हत्याकांडानंतर तणावपूर्ण शांतता; घटनास्थळी जमावबंदी लागू
परभणी जिल्ह्यातील सर्वात चर्चेतील मतदारसंघ असलेल्या गंगाखेड येथे महायुतीने शिवसेनेच्या विशाल कदम यांना उमेदवारी दिलेली असताना शेवटच्या क्षणी रासपने रत्नाकर गुट्टे यांना उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. मात्र, आज उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्यात काहीतरी सुलानामा होईल, असे वाटत होते. परंतु, प्रत्यक्षात मात्र काहीही झाले नाही. रासपने आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे विशाल कदम यांना अपक्ष तथा माजी आमदार सीताराम घनदाट, संतोष मुरकुटे, वंचित बहुजन आघाडीच्या करुणा कुंडगीर, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्यासोबतच रासपच्या रत्नाकर गुट्टे यांचा सामना करावा लागणार आहे. या ठिकाणची लढत पंचरंगी झाली आहे. यात कोण बाजी मारते, हे पाहणे सर्वांसाठीच औसुक्याचे आहे.
हेही वाचा- परळी विधानसभा : धनंजय मुंडेंकडून रोजगार निर्मिती, तर पंकजांचा सुरक्षेच्या मुद्द्यावर भर
परभणी विधानसभेतील काँग्रेसचे उमेदवार रविराज देशमुख यांना बंडखोर सुरेश नागरे यांचे कडवे आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे सुरेश नागरे यांनी काँग्रेसकडून तिकीट मिळणार, या अपेक्षेने जोरदार तयारी चालवली होती. प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांनाच तिकीट मिळेल, असे वाटत होते. परंतु, प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही. रविराज देशमुख यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या केवळ एक दिवस आधी एबी फॉर्म मिळाला. आता त्यांना शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. राहुल पाटील यांच्यासह सुरेश नागरे या बंडोबांचे देखील आव्हान असणार आहे. याशिवाय परभणीच्या निवडणूक रिंगणात 'वंचित'चे मोहम्मद गौस झैन तसेच एमआयएमचे अली खान यांचाही सामना करावा लागणार असून या ठिकाणची निवडणूक सुद्धा चौरंगी झाली आहे.
पाथरी मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार मोहन फड यांच्यासमोर शिवसेनेचे डॉ.जगदीश शिंदे यांचे आव्हान आहे. या ठिकाणी मुख्य लढत आमदार मोहन फड आणि काँग्रेसचे उमेदवार सुरेश वरपुडकर यांच्यात होत आहे. तरी देखील या दोघांनाही निवडणूक सोपी नाही. विशेषत: मोहन फड यांना बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न करावे लागणार आहे. शिवसेनेच्या खासदारांशी त्यांचे संबंध पाहता ते त्यांना कितपत शक्य होईल, हे येणाऱ्या काही दिवसात समजेलच. परंतु, मोहन फड यांना जनतेचा पाठिंबा मिळत असला तरी ऐनवेळी काही चक्र फिरल्यास जनमत त्यांच्या विरोधात जाऊ शकते, अशी परिस्थिती आहे.
याखेरीज जिंतूर मतदार संघात सुध्दा भाजपच्या मेघना बोर्डीकर यांना शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते राम खराबे पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवून आव्हान दिले आहे. जिंतूरात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार विजय भांबळे आणि भाजपच्या मेघना बोर्डीकर यांच्यात थेट लढत होत आहे, असे असले तरी शिवसेनेचे बंडखोर खराबे पाटील हे मात्र मेघना बोर्डीकर यांना डोकेदुखी ठरणार आहेत. दोघांचेही मतदार एकाच विचारधारेचे असल्याने बोर्डीकर यांना त्यांची समजूत घालावी लागणार. परंतु, त्या यात किती यशस्वी ठरतील, हा प्रश्नच आहे. बाकी जिंतूर मतदार संघात पारंपारिक भांबळे आणि बोर्डीकर या दोन कुटुंबांमधील पारंपरिक संघर्ष यावेळीही पाहायला मिळणार आहे.
विधानसभा निहाय परिस्थिती-
परभणी - परभणी मतदारसंघातील 27 पैकी 12 उमेदवारांनी माघार घेतली असून 15 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. यात हेमंत साळवे, शेख शकुर शेख ईस्माईल, जाकेर अहेमद खान, शेख सलीम शेख इब्राहिम, अखतर एहसान खान, अरुण पवार, अब्दूल सत्तार अजीज, शेख विखार अहेमद, सय्यद शाकेर अहेमद, अहमद खादर, सुभाष अंभोरे, निहाल कौसडीकर यांनी माघार घेतली असूूून, आता निवडणुकीच्या रिंगणात आमदार डॉ.राहूल पाटील (शिवसेना), रविराज देशमुख (काँग्रेस), सचिन पाटील (मनसे), अली खान मोईन खान (एमआयएम), शिवलिंग बोधने (प्रहार), मोहम्मद गौस झैन ('वंचित'), विनोद भोसले (बहुजन मुक्ती पार्टी), प्रतिभा मेश्राम (बहुजन समाज पार्टी) तर अपक्ष सुरेश नागरे, अॅड.अफजल बेग, अब्दुल जमीर, गोविंद देशमुख, मोईज अन्सारी, शेख अली, संगीता जगदाळे आदी उमेदवार शिल्लक आहेत.
गंगाखेड- मतदारसंघातील एकुण 23 पैकी 8 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून एकुण 15 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये अभय कुंडगीर, त्रिंबक मुरकुटे, बालासाहेब निरस, भरत घनदाट, राजाभाऊ फड, धन्यकुमार शिवणकर, सविता मुरकुटे, डॉ.संजय कदम हे असूूून आता रिंगणात आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे (राष्ट्रवादी काँग्रेस), विशाल कदम (शिवसेना), विठ्ठल जवादे (मनसे), देवराव खंदारे (बसपा) करुणा कुंडगीर (वंचित), गजानन गिरी (बहुजन विकास आघाडी), रत्नाकर गुट्टे (रासप), सखाराम बोबडे (महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी) तसेच अपक्ष म्हणून संतोष मुरकुटे, माजी आमदार सीताराम घनदाट, अजहर मेहताब, गजानन मरगीर, तुकाराम व्हावळे, बालाजी सगर, संजीव प्रधान हे आहेत.
पाथरी - मतदारसंघातील एकुण 14 पैकी 4 उमेदवारांनी माघार घेतली असून एकुण 10 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. माघार घेणाऱ्यांमध्ये प्रल्हाद पाटील, मुंजाजी कोल्हे, राम शिंदे व डॉ . संजय कच्छवे यांचा समावेश आहे. तर रिंगणात आता मोहन फड (भाजप), सुरेश वरपुडकर (काँग्रेस), गौतम उजगरे (बहुजन समाज पार्टी) अजय सोळंके (आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी), विलास बाबर (वंचित बहुजन आघाडी) नारायण चव्हाण तर अपक्ष डॉ. जगदीश शिंदे, जयराम विघ्ने, मुजमिल आलम व मोईज अन्सारी हे शिल्लक आहेत.
जिंतूर - विधानसभा मतदार संघातील 17 पैकी 4 उमेदवारांनी माघार घेतली असून, 13 जण निवडणूक लढवणार आहेत. माघार घेणाऱ्यांमध्ये रामप्रसाद कदम बोर्डीकर, खंडेराव आघाव, कुरेशी अवेस व सयद दिलावर या अपक्षांचा समावेश आहे. तर रिंगणात मेघना बोर्डीकर (भाजप), आमदार विजय भांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस), मनोहर वाकळे (वंचित बहुजन आघाडी), अंकुश राठोड (कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया), राजेंद्र घनसावध (बसप), बालाजी शिंदे (संभाजी ब्रिगेड), महेंद्र काळे (आंबेडकर नॅशनल काँग्रेस), दिनकर गायकवाड (बहुजन महा पार्टी) तर अपक्ष राम पाटील, स.जावेद हाश्मी, राजेश भिसे, देवानंद रत्ने व ज्ञानदेव दाभाडे हे आहेत.