परभणी - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कमी होणाऱ्या कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. मागील दोन दिवसांप्रमाणे आज मंगळवारी देखील नव्याने आढळलेल्या कोरोनाबधितांची संख्या वाढतीच असून, 462 नव्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर केवळ 158 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान, समाधानाची बाब म्हणजे मृत्यूदर कमी झाला असून, गेल्या 24 तासात केवळ 2 बधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
3 हजार 981 ॲक्टिव्ह रुग्ण -
जिल्ह्यातील बाधितांची संख्या 49 हजार 271 वर पोहोचली असून, त्यातील 44 हजार 78 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने उर्वरीत 3 हजार 981 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून कोरोनाचा संसर्ग कमी होत होता. दररोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 200वर पोहोचली होती. मात्र शनिवारपासून त्यात अचानक वाढ झाली. तसेच नव्या बाधितांपेक्षा बरे होऊन घरी परतणाऱ्यांची वाढलेली संख्या देखील पुन्हा घटली आहे. कारण आज 158 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण पुन्हा एकदा वाढला आहे.
आतापर्यंत 3 लाख 32 हजार 343 जणांची तपासणी -
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचे रुग्ण ज्या प्रमाणात वाढत होते, आता त्या प्रमाणात मे महिन्यात घटतांना दिसून येत होते. मात्र, आता त्यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज मंगळवारी 462 नवीन बाधित आढळले तर 158 कोरोनामुक्त झाले. तसेच गेल्या 24 तासात 2 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांच्या कोरोना कक्षात 3 हजार 981 बाधित उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत एकूण 1 हजार 212 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 49 हजार 271 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यापैकी 44 हजार 78 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 3 लाख 32 हजार 343 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 2 लाख 82 हजार 883 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले, तर 49 हजार 271 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. 1140 अनिर्णायक व 140 नमुने नाकारण्यात आले. दरम्यान, गेल्या 24 तासात जिल्ह्यात 2 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. यात 1 पुरुष, 1 महिलांचा समावेश आहे.