परभणी - दहावीच्या परिक्षेदरम्यान बुधवारी भूमितीच्या पेपरमध्ये कॉपी करणाऱ्या २९ विद्यार्थ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई ४ जिल्ह्यातील शाळेत करण्यात आली.
दहावीची परीक्षा जिल्ह्यातील ९४ केंद्रावर सुरू आहे. कॉपी बहाद्दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ९४ बैठ्या पथकांसह ३३ भरारी पथके फिरत आहेत. या परीक्षेसाठी ३० हजार ८८९ विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. त्यापैकी बुधवारी भूमिती विषयाच्या परीक्षेत प्रत्यक्षात ३० हजार १४४ विद्यार्थी हजर होते. १ हजार ४४ विद्यार्थ्यांनी परीक्षाच दिली नाही. येथील सर्व परीक्षा केंद्राना सीसीटीव्हीच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे. अनेक केंद्रांवर सामूहिक कॉपीचा प्रकार सुरू आहे. सीईओ बी. पी. पृथ्वीराज यांनी एरंडेश्वर येथील प्रकार उघडकीस आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
दरम्यान, बुधवारी भरारी पथकाने परभणी तालुक्यातील पिंगळी येथील आनंद माध्यमिक विद्यालयात २, पूर्णा येथील संस्कृती माध्यमिक विद्यालय २, एरंडेश्वर येथील हायटेक विद्यालयात १४ आणि सोनपेठच्या माधवाश्रम खडका कॅम्प विद्यालयातील ११ विद्यार्थ्यांना रंगेहाथ पकडून त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.