परभणी - बारावीच्या द्विलक्षी अभ्यासक्रम आणि सामान्य ज्ञान विषयाची परीक्षा शुक्रवारी पार पडली. या परिक्षेदरम्यान एकाच केंद्रात तब्बल 24 कॉपीबहाद्दरांना रंगेहात पकडण्यात आले तर पूर्णा शहरात 2 केंद्रांवर 4 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा - पुण्यातून धूम ठोकलेले कोरोना संशयित कुटुंब अद्याप बेपत्ता
कॉपीवर आळा घालण्यासाठी शासन स्तरावर कितीही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, तरीही शिक्षण विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने अनेक ठिकाणी कॉपीचे गैरप्रकार सर्रास सुरु असल्याचे दिसून येत आहे. परभणी तालुक्यात पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या परीक्षेत शिक्षकांनीच उत्तरे सांगितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे शिक्षण विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले. त्यानंतर कॉपीबहाद्दरांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. बैठ्या तसेच भरारी पथकांना कारवाईच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, यापूर्वी भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयाच्या परीक्षेदरम्यान तर तब्बल 68 कॉपीबहाद्दरांना पकडून त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. याचप्रमाणे रसायनशास्त्र आणि वाणिज्य संघटन विषयाच्या परीक्षेत 15 कॉपीबहाद्दरांना पकडून त्याच्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यना, शुक्रवारी परभणी शहराजवळील मन्नाथ कनिष्ट महाविद्यालयात द्विलक्षी अभ्यासक्रम आणि सामान्य ज्ञान विषयाच्या परीक्षेत 24 तर पूर्णा शहरातील संस्कृती कनिष्ठ महाविद्यालयात तर 3 कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रावर एका विद्यार्थ्याला पकडण्यात आले.
द्विलक्षी अभ्यासक्रम आणि सामान्य ज्ञान तसेच ग्रंथालय माहिती तंत्रज्ञान या विषयांची परीक्षा अनुक्रमे जिल्ह्यातील 43 आणि 38 केंद्रांवर घेण्यात आली. यात अनुक्रमे सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात 3 हजार 534 आणि 1 हजार 781 परीक्षार्थींनी परीक्षा दिली. या सर्वच परीक्षा केंद्रांवर बैठे पथक तैनात होते. तर 33 भरारी पथकांनी जवळपास सर्वच केंद्रांवर भेटी देऊन तपासणी केल्यानंतर हे 28 कॉपीबहाद्दर आढळुन आले आहेत.