परभणी - शहर बस स्थानकात शुक्रवारी सुरू करण्यात आलेले आरोग्य केंद्र सकाळी उद्घाटन झाल्यानंतर दुपारपासून डॉक्टर आणि कर्मचारी निघून गेल्याने बेवारस स्थितीत पडले होते. विशेष म्हणजे दुपारनंतर पुणे, मुंबई येथून आलेल्या अनेक बसमधील प्रवाशांची कुठलीही तपासणी न होत ते शहरात दाखल झाले. ही गंभीर बाब ई टीव्ही भरतने रात्री विशेष बातमीतून उघडकीस आणली होती. याची दखल जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी घेऊन स्वत: बसस्थानकाला भेट देऊन हे कोरोना तपासणी केंद्र २४ तास चालू ठेवण्याचे लेखी आदेश बजावले आहेत. यामुळे मोठ्या शहरातू आलेल्या प्रवाशांची तपासणी होणार असल्याने परभणीकरांना कोरणाचा जाणवणारा धोका काही अंशी टळणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी परभणीच्या बस स्थानकात पुणे, मुंबई तसेच इतर मोठ्या शहरातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी कोरोना तपासणी केंद्राची शुक्रवारी स्थापना करण्यात आले होते. विशेष म्हणजे सकाळी उघडण्यात आलेले हे केंद्र दुपारीच अक्षरशः बेवारस स्थितीत दिसून आले. आरोग्य विभागाने केवळ फोटो काढण्यात पुरता उद्घाटनाचा कार्यक्रम उरकला आणि या तपासणी केंद्राकडे सपशेल दुर्लक्ष केले. यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता.
विशेष म्हणजे दुपारनंतर सायंकाळी ४ वाजता पाथरी डेपोची पुणे गाडी परभणीत दाखल झाली. त्यानंतर परभणी-कल्याण ही बस सायंकाळी ६ वाजता आली. शिवाय सायंकाळी ७ वाजता पुणे-वसमत ही देखील गाडी पुण्यातून परभणीत दाखल झाली. या प्रमाणेच रात्री साडेदहा वाजेपर्यंत इतर दोन गाड्या पुणे-मुंबई या ठिकाणाहून परभणीत आल्या. या सर्व बसमधून अनेक प्रवासी परभणीत उतरले. ते थेट कुठलीही तपासणी न होता घरी पोहोचले आहेत. त्यांची तपासणी न झाल्याने त्यांच्यापासून त्यांच्या कुटुंबाला व परभणीकरांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हीच बाब काल रात्री 'ईटीव्ही भारत' ने विशेष बातमीच्या माध्यमातून उघडकीस आणली. याची आज (शनिवारी) जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दखल घेतली. परभणीच्या बसस्थानकाला त्यांनी स्वतः भेट देवून पाहणी केली. मात्र, त्याच्या काही वेळापूर्वी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना त्यांनी आता बस स्थानकातील कोरोना तपासणी केंद्र 24 तास सुरू राहील, अशी माहिती दिली. आणि त्यानुसार दुपारी बारा वाजताच हे करोना तपासणी केंद्र 24 तास सेवा देण्यासाठी सुरू झाले.
याठिकाणी एक डॉक्टर आणि इतर तीन कर्मचारी असून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने देखील या ठिकाणी सानेटायझर घेऊन कर्मचारी जनजागृतीसाठी बसल्याचे दिसून आले. एकूणच हे केंद्र आता 24 तास चालू राहणार असल्याने मोठ्या शहरातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी होईल. शिवाय सामान्य प्रवासीदेखील या ठिकाणी काही त्रास असेल तर शंका दूर करायला जातील. त्यामुळे याचा प्रवासी तसेच सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.