परभणी - परभणीत महानगरपालिकेच्या वतीने बाजारात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना दंड लावण्यात येत आहे. या अंतर्गत आज १०३ जणांना पकडून त्यांच्याकडून १० हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
कोरोनाच्या विषाणूपासून स्वतः चा बचाव करण्यासाठी मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्स ठेवणे, ही दोन महत्त्वाची कामे आहेत. मात्र, याकडे वारंवार सांगून देखील अनेक नागरिक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे मागच्या दोन आठवड्यांपासून शहर महापालिकेच्या वतीने शहरात विनाकारण रस्त्यावर फिरणार्यांना तसेच सोशल डिस्टन्स न ठेवणाऱ्याना दंड आकारण्यात येत आहे. या शिवाय दुकानांवर फलक न लावल्याने व्यापाऱ्यांना देखील दंड लावण्यात येत आहे.
मंगळवारी बाजारपेठेतील शिवाजी महाराज चौक व गांधी पार्क येथे मास्क न लावल्याबद्दल 103 नागरिकांना दंड आकारण्यात आला आहे. त्यांच्याकडून 10 हजार 300 रूपये वसुल केले. हि कारवाई सहायक आयुक्त अल्केश देशमुख, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, कोंडवाडा प्रमुख विनय ठाकूर, मोहम्मद रफीक, कदम, बारवे आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली आहे.