परभणी - जिल्हा रुग्णालयातील कोरोना संक्रमित कक्षात जिंतूर येथील एका 60 वर्षीय कोरोनाबाधिताचा आज गुरुवारी पहाटे 3 वाजता मृत्यू झाला आहे. या रुग्णाला अन्य काही आजार देखील होते. दरम्यान, सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर सकाळी 9.30 वाजता रुग्णांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी महापालिका कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
सदर रुग्ण हे जिंतूर शहरातील नुर कॉलनी येथील रहिवासी होते. ते इतर काही आजारांनी ग्रस्त होते. कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांना 14 जुलै रोजी परभणी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना संक्रमित कक्षात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज गुरुवारी पहाटे 3 वाजता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या आता 9 एवढी झाली आहे. 9 पैकी 2 रुग्ण हे नांदेड येथे उपचार घेत होते. तर परभणी जिल्ह्यात रुग्णालयाच्या कोरोना संक्रमित कक्षात 7 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 312 एवढी झाली आहे. त्यातील 149 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर 154 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान 173 रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल प्रलंबित आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून दररोज परभणी जिल्ह्यात 10 ते 20 रुग्ण नियमित आढळून येत आहेत. त्यातच गंगाखेड येथे झालेल्या एका शाही विवाह स्वागत सोहळ्यानंतर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे.