पालघर (वाडा)- जव्हार शहरात 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांनी भव्य मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात हा दिन साजरा केला. यावेळी पारंपरिक वेशभूषा करून आदिवासी समाजातील बांधवांनी समाजाच्या संस्कृती व परंपरेचे दर्शन घडवले.
तालुक्यातील आश्रम शाळा, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तसेच अन्य ठिकाणी आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासींच्या पारंपरिक वेशभूषेत भव्य दिव्य मिरवणूक काढून जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, जव्हार शहरात मध्यवर्ती ठिकाणी हजारो तरुणांचा जल्लोष पाहायला मिळाला.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांचे पारंपरिक नृत्य तारपा नाच, ढोलनाच, सांबळ नाच, टिपरी नाच, तुरनाच, गरभानाच, मादोळ नाच नागरिकांना पहायला मिळाले. आदिवासीं बांधवांनी पारंपारिक पद्धतीने वेशाभूषा करून नृत्य सादर केले. मात्र, जव्हार शरातील रॅली संपत असताना नाचताना काही तरुणांकडून तुरळक वादही झाले. परंतु चोख पोलीस बंदोबस्त असल्याने रॅलीवर नियंत्रण करता आले.
जव्हार शहरात हनुमान पॉईंट, मांगेलवाडा, अंबिकाचौक, गांधीचौक, तारपाचौक, पचाबत्ती नाका, यशवंतनगर येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच आदिवासी नाक्याजवळ आदिवासी प्रमुखांनी आदिवासींचे महत्व पटवून दिले. त्यानंतर मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
आदिवासी दिनाचे आयोजन करण्यासाठी आदिवासी आघाडी अध्यक्ष एकनाथ दरोडा, सचिव महेश भोये तसेच अन्य सल्लागार मंडळी यांनी पुढाकार घेतला. या मिरवणुकीला शेकडो आदिवासी बांधव, आदिवासी शिक्षक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, युवावर्ग, महिलावर्ग तसेच असे तालुक्यातील हजारो बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.