पालघर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बॉम्बे रेयॉन फॅशन लि. या कंपनीतील कामगारांनी दोन दिवसापासून आंदोलन सुरू केले आहे. प्रशासन व कंपनीकडून मागील सहा महिन्यांपासून पगार व न्याय मिळत नसल्याचा आरोप या कामगारांनी केला आहे. कामगारांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत कंपनीच्या गेटसमोर कामबंद आंदोलन सुरु केले आहे.
बॉम्बे रेयॉन फॅशन लि. या कंपनीने जानेवारी २०२० पासून त्यांच्या जवळपास ३ हजार कामगारांना पगारच दिला नसल्याचा कामगारांनाचा आरोप आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत पाच वेळा आंदोलन केले आहे. कंपनी व्यवस्थापनाने लेखी आश्वासन दिल्यानंतरही कामगारांना पगार दिलेला नाही. मागील तीन महिन्यांपासून पगारासाठी आंदोलन करणाऱ्या कामगारांना कामावर न घेता इतर काही कामगारांना कामावर बोलावून त्यांना पगार देण्यात आला. मात्र काहींना अद्याप पगार मिळालेला नाही.
कंपनी मालक कामगारांचे थकित पगार देत नसल्याने आरआरसी रिव्हेन्यू रिकव्हरी प्रमाणपत्र वसुलीबाबत जिल्हाधिकारी पालघर यांना कळवले असतानाही त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. पगार न मिळाल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कंपनीतील कामगारांनी अखेर कामबंद आंदोलनास सुरवात केली आहे.