पालघर - वैतरणा खाडी पुलावरील रेल्वे ट्रॅकच्या बाजूला लावण्यात आलेल्या लोखंडी पट्ट्यांच्या फटीमधून खाली पाण्यात पडून वाढीव येथील बेबीबाई रमेश भोईर(वय ६०) ही महिला बेपत्ता झाली आहे. रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप वाढीव येथील ग्रामस्थ करत आहेत.
वाढीव नागरीकांना सफाळे किंवा वैतरणा स्थानक गाठण्यासाठी वैतरणा पुलावरील रेल्वे ट्रॅकच्या बाजूला लोखंडी पट्ट्या टाकून बनवलेल्या रस्त्यावरून जाण्याशिवाय अन्य मार्ग नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. बेबीबाई खाजगी रुग्णालयात दाखल आपल्या मुलीसाठी डबा घेऊन वैतरणा स्थानकावर जात होत्या. यावेळी अचानक आलेला पाऊस आणि वारा यामुळे लवकर स्थानक गाठण्याच्या दृष्टीने त्या पटापट चालू लागल्या. या गडबडीत रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या फटीमधून त्या पुलाखालून वाहणाऱ्या वैतरणा खाडीत पडल्या.
बेबीबाई अजून सापडल्या नसून त्यांचा शोध सुरू आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने रस्ता तयार करताना केलेल्या हलगर्जीपणाबद्दल नागरीकांमधून संतप्त प्रतिक्रीया येत आहेत.